केशव कदम बीड
दि. 25 : बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, अनेक प्रकरणांमध्ये बाहेरील जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकांकडून कारवाया होत असल्याचे चित्र आहे. अशातच गुरुवारी (दि. 25 जून) जालना एसीबीच्या पथकाने बीड शहरातील शहर पोलीस ठाण्यात सापळा रचून एका पोलीस अंमलदारास 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या कामाशी संबंधित असलेल्या भारतीय चलनक्षम लिखत अधिनियम (एन.आय. ॲक्ट) कलम 138 अंतर्गत नोटीस तामिल करण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने 10 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत फिर्यादीने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने गुरुवारी शहर पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला. यावेळी पोलीस अमलदार सुशेन प्रकाश उगले याला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जालना एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, बीड जिल्ह्यात सातत्याने उघडकीस येणाऱ्या लाचखोरीच्या घटनांमुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, अशा प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
