बीड | दि.26 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)च्या वतीने शनिवारी (दि. 27) राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत 29 जूनपासून छत्रपती संभाजीनगर येथे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.या पत्रकार परिषदेला आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, मोहनराव जगताप, नरेंद्र काळे, सय्यद सलीम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, राज्यातील 36 लाख शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि अन्नदात्याच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली; मात्र त्यामध्ये अनेक जाचक अटी घातल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहिले. ते पुढे म्हणाले की, सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशनापूर्वी 22 जून रोजी बैठक घेऊन कर्जमाफीतील अटी शिथिल करण्याचा मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पंढरपूरच्या पवित्र भूमीत दिलेला शब्द सरकारने पाळलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला. सरकारच्या या भूमिकेच्या निषेधार्थ 29 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. कर्जमाफीतील जाचक अटी तातडीने रद्द कराव्यात, 50 हजार रुपयांऐवजी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची मर्यादा निश्चित करावी आणि शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक रुपयात पीक विमा योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.