केशव कदम
बीड दि.7 : लाजकोरीच्या घटना जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. त्यात अंबाजोगाई येथील महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मनीष कुंडलिक डाकरे यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. ७) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा एक्वा प्लांट असून त्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावावर सही करून मंजुरी देण्यासाठी कार्यकारी अभियंता मनीष डाकरे यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांनी याबाबत बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी (दि.७) डाकरे यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना कार्यालयातून रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.