Site icon कार्यारंभ लाईव्ह

घाटनांदूरमध्ये २१ वर्षीय युवकाचा चाकूने वार करून खून

GHATNANDUR CRIME

GHATNANDUR CRIME ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे

घाटनांदूर (प्रतिनिधी) : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे काल मध्यरात्री एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका २१ वर्षीय तरूणाचा तिक्ष्ण हत्याराने (चाकूने) वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय २१, रा. पट्टीवडगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात ज्ञानेश्वरचा एक साथीदार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात नातेवाईकतक्रार देण्यासाठी बसून आहेत.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत ज्ञानेश्वर वाकडे हा गेल्या एक वर्षापासून लातूर जवळील हायवेवर एका ठिकाणी आचारी म्हणून काम करत होता. शनिवारी (दि. ११ जुलै) रात्री ११:३० वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर हा अंबाजोगाईवरून घाटनांदूरच्या दिशेने त्याच्या स्वतःच्या मोटारसायकलवरून जात होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे इतर दोन मित्रही होते.
ते घाटनांदूर येथील साठे चौकात आले असता, तिथे त्यांचा काही जणांसोबत वाद झाला. या वादविवादातून संशयित आरोपींनी तिक्ष्ण चाकूने ज्ञानेश्वरवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला.
हल्ला झाला त्या वेळी मोटारसायकलवर ज्ञानेश्वरसोबत असलेल्या दोन मित्रांपैकी एकाने प्रसंगावधान राखून घटनास्थळावरून पळ काढल्याने तो सुदैवाने बचावला. तर दुसरा मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत ज्ञानेश्वरचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी याच रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना पकडण्यात आले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Exit mobile version