बीड

ड्रोनद्वारे केली मोजणी ; 10 हजारब्रास वाळूसाठा जास्त आढळला!

By Keshav Kadam

July 29, 2026

-एसडीओ शुभम पवार यांचा जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल

केशव कदम । बीड दि.28 : गेवराई तालुक्यातील बोरगाव बु.-1, बोरगाव बु.-2 आणि सावरगाव येथील वाळूसाठ्याच्या मोजणीत मोठी तफावत आढळून आली आहे. टेंडरधारकांनी सादर केलेल्या वाळूसाठ्याच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष उपलब्ध साठा कमी असल्याचे ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या मोजणीत समोर आले आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी शुभम पवार यांनी अहवाल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सादर केला असून संबंधित टेंडरमालकांना मंगळवारी (दि.28) खुलासा सादर करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव बु.-1, बोरगाव बु.-2 आणि सावरगाव येथील तीन वाळूघाटांवर एकूण 13 हजार 721 ब्रास वाळूसाठा उपलब्ध असल्याची माहिती टेंडरधारकांकडून देण्यात आली होती. मात्र, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वाळूसाठ्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उपविभागीय अधिकारी शुभम पवार यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी जबाबदारी दिली होती. त्याप्रमाणे पवार यांनी ड्रोनच्या माध्यमातून मोजणी केली. या मोजणीत संबंधित ठिकाणी दाखवलेल्या साठ्यापेक्षा प्रत्यक्ष वाळूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी असल्याचे स्पष्ट झाले. बोरगाव बु.2 येथे 10 ते 12 हजार ब्रास अधिक वाळूसाठ्याची तफावत आढळून आल्याची माहिती आहे. सावरगाव आणि बोरगाव बु.-1 येथील साठ्यातही तफावत आढळली आहे. ड्रोन मोजणीमुळे वाळूसाठ्याबाबतची वास्तविक स्थिती समोर आली असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित तीनही वाळूघाट टेंडरधारकांना दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खुलासा प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

शिल्लक असलेला वाळूसाठाघरकूल लाभार्थ्यांसाठी द्यावावाळूघाटावरील 10 टक्के वाळू घरकूल लाभार्थ्यांना देणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत केवळ बोगसगिरीच करण्यात आली असून घरकूल लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आले. आतातरी सावरगाव, बोरगाव बु., बोरगाव येथे शिल्लक असलेल्या वाळूसाठाच्या पावत्या रद्द करुन ही वाळू घरकूल लाभार्थ्यांना जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत द्यावी, अशी मागणी गोदावरी बचाव सर्वपक्षीय समितीने केली आहे. तसेच गेवराई तालुक्यात गोदापात्राच्या शेजारील गावात अनेक ठिकाणी वाळूचे साठे करण्यात आलेले आहेत. त्यावरही तातडीने छापे टाकून हा वाळूसाठा जप्त करावा, अशी मागणी समितीने केली.