-चांगल्या कामगिरीला ’रिवॉर्ड’, कामचुकारांवर होणार कारवाई
बीड दि.28 : बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे 28 व 29 जुलै रोजी अंबाजोगाई येथे दोन दिवस मुक्कामी राहून येथील पोलीस विभागाच्या सर्व शाखांची सखोल पाहणी करणार आहेत. प्रत्येक शाखेच्या कामकाजाचा आढावा घेताना अधिकारी व कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेची तपासणी केली जाणार असून उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना ‘रिवॉर्ड’ दिले जाणार आहे. तर कामात हलगर्जीपणा, प्रलंबित गुन्हे, ऑनलाइन प्रणालीकडे दुर्लक्ष आणि शिस्तभंग आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक काँवत हे दोन दिवसांत अंबाजोगाई विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचार्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणार आहेत. परेड, गुन्ह्यांचा तपास, प्रकरणांची निर्गती, अभिलेखांची अद्ययावत स्थिती, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा आणि कार्यालयीन शिस्त या सर्व बाबींची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे अंबाजोगाई विभागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे. पोलीस ठाण्यांतील शिस्त, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमतेवर भर देण्यासाठी पोलीस अधीक्षक काँवत यांनी अलीकडेच अनेक उपक्रम सुरू केले आहेत. ‘डीप आय’ उपक्रमाला राज्यस्तरावर चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दर महिन्याला एका पोलीस ठाण्याची कोणतीही पूर्वसूचना न देता सरप्राईज पाहणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या मोहिमेची सुरुवात नुकतीच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यापासून करण्यात आली. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पाहणीत प्रलंबित गुन्हे, तपासातील दिरंगाई, अद्ययावत नसलेले अभिलेख, अस्वच्छ परिसर आणि जप्त मुद्देमालाची अयोग्य व्यवस्था अशा अनेक त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. त्यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना कामकाजात तातडीने सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले होते. नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा करणे आणि प्रत्येक विभाग स्वच्छ, शिस्तबद्ध व अद्ययावत ठेवणे ही प्रत्येक पोलीस अधिकार्याची जबाबदारी असल्याचे काँवत यांनी स्पष्ट केले होते. अंबाजोगाईतील दोन दिवसांच्या दौर्यातही अशाच पद्धतीने प्रत्येक विभागाची तपासणी केली जाणार असून चांगल्या कामाचे कौतुक आणि निष्काळजीपणावर कठोर कारवाई, या दुहेरी भूमिकेतून पोलीस दलात शिस्त आणि उत्तरदायित्व अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.
प्रत्येक कर्मचार्यासोबत साधणार संवाद
दोन दिवसात पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे प्रत्येक पोलीस अंमलदारासोबत संवाद साधणार आहेत. त्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. एवढंच नव्हे तर परेडपासून ते गुन्हे निर्गतीपर्यंत अंमलदारांनी केलेल्या कामाचा आढावा घेणार आहेत. यामध्ये ज्यांचे काम वेळेवर व शिस्तप्रिय असेल त्यांना रिर्वाड देखील देणार आहेत. तसेच कामचुकारपणा करणार्यांवर कारवाई देखील केली जाणार आहे.
