केशव कदम : बीड
घरकुलच्या नावाखाली अनाधिकृत वाळूघाट तयार करुन 25 हजार ब्रास वाळूचे उत्खनन केल्याप्रकरणी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्या निलंबनासाठी जिल्हाधिकार्यांनी महसूल सचिवांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. तर चकलांबा पोलीस ठाण्यात नायब तहसीलद संजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन महसूल, पोलीस, एजंट अशा 19 जणांवर गुन्हा दाखल आहे. यातील अमोल अप्पासाहेब लाखे (रा.एरंडगाव ता.गेवराई जि.बीड) यास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, अंमलदार भाऊसाहेब चव्हाण आदींनी गोपनीय माहितीच्या आधारे शेतातून बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. आज गुरुवारी (दि.30) एरंडेला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
एसडीओ,तहसीलदारांसह महसूल अधिकार्यांचे घेतले लेखी जबाब!बीड : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील घरकूल वाळू घोटाळा प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने महसूल विभागातील अधिकार्यांची सखोल चौकशी सुरु केली आहे. बुधवारी (दि.29) बीडमध्ये दिवसभर चौकशी मोहीम राबवत तहसीलदारांसह महसूल विभागातील एकूण 12 अधिकार्यांचे लेखी जबाब नोंदवून घेतले. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. या घडामोडीमुळे महसूल विभागासह जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
राक्षसभुवन वाळू प्रकरणात यापूर्वी घरकूल योजनेतील लाभार्थ्यांच्या ओटीपीचा गैरवापर करून हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा झाल्याचा आरोप समोर आला होता. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात 19 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तपासाची सूत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे गेल्यानंतर चौकशीची व्याप्ती वाढली असून संबंधित कागदपत्रे, महसूल नोंदी आणि प्रशासकीय निर्णयांची छाननी करण्यात येत आहे. बुधवारी झालेल्या चौकशीत महसूल विभागातील अनेक अधिकार्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आल्याने या प्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपास यंत्रणा संपूर्ण प्रकरणातील जबाबदार्या, प्रशासकीय प्रक्रिया आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासत असून आवश्यकतेनुसार पुढील चौकशी आणि कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राक्षसभुवन वाळू प्रकरणातील तपास निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात असून, पुढील काही दिवसांत आणखी काही अधिकारी व संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक संतोष शेजाळ करत आहेत.