बीड

उपमुख्यमंत्री बीडमध्ये असतांना 45 लाखांची लाच स्विकारली!

By Keshav Kadam

July 31, 2026

केशव कदम बीडदि.31 : पाचशे, हजार नव्हे तर तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड येथील सामाजिक वनीकरण विभागातील अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने शुक्रवारी (दि.31) सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई बीड जिल्ह्यात असतांना अधिकार्‍याने एवढी मोठी लाच घेण्याची हिंमत केली आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (beed acb trap news)

श्रीनिवास लखमवाड असे सामाजिक वनीकरण विभागातील लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. लखमवाड याने सन 2025-26 मधील वृक्षलागवडीची बिले मंजूर करून देण्यासाठी, कर्मचार्‍यांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी तसेच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी 45 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी सापळा रचला. यावेळी श्रीनिवास लखमवाड याला 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. यामध्ये पाच लाख रुपये खर्‍या नोटा व बाकी मनोरंजन(खोट्या नोटा) बँक मधील नोटा स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टिमने केल्यानंतर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे बीडमध्ये दाखल झाल्या आहेत.