बीड दि.1 : राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 भूसंपादनातील वाढीव मोबदला (मावेजा) प्रकरणातील आरोपी त्रिंबक भानुदास पिंगळे आणि शेख अजहर यांना जामीन मंजूर केला आहे. हा आदेश न्या. अभय वाघवसे यांनी दिला.
या प्रकरणी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बीड सतीश धुमाळ यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, बीड येथील भूसंपादन कार्यालय व उपविभागीय कार्यालयातील शासकीय कर्मचार्यांनी वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्यांच्या बनावट स्वाक्षर्या करून कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून शासनाची फसवणूक व विश्वासघात करण्यात आला. मूळ मोबदला सुमारे 68 कोटी रुपये असताना तो 310 कोटी रुपयांपर्यंत वाढवून दाखविण्यात आला आणि त्यातून 73.40 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक झाल्यानंतर राज्यभर या घोटाळ्याची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर उपविभागीय कार्यालय व भूसंपादन विभागातील कंत्राटी कर्मचारी त्रिंबक पिंगळे आणि शेख अजहर यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर दोन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की, या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले असून तपास पूर्ण झाला आहे. दोन्ही आरोपी हे कंत्राटी कर्मचारी असून निर्णयप्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही. तसेच, तपास पूर्ण झाल्याने त्यांना पुढे कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड.सुदर्शन जी. साळुंके आणि अॅड.सय्यद तौसीफ यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.
————–