नांदेड येथील निवासस्थानी एसीबीची झडती; पुढील तपास छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे
केशव कदम | बीड
दि.1 : ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड यांच्या नांदेड जिल्ह्यातील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) झडती घेतली. या कारवाईत १ लाख ७ हजार रुपयांची रोकड आणि सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास छत्रपती संभाजीनगर एसीबीकडून सुरू आहे.
शुक्रवारी बीडमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर लखमावाड यांना ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या विविध प्रलंबित कामांसाठी ही लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली. या कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने आरोपीच्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी येथील निवासस्थानी झडती घेतली. झडतीदरम्यान १ लाख ७ हजार रुपयांची रोकड व ३ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या मालमत्तेची नोंद पंचनाम्यात करण्यात आली असून, आरोपीच्या उत्पन्नाच्या स्रोतांचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, राज्यातील वनसेवा परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवून सेवेत आलेल्या अधिकाऱ्यावर एवढ्या मोठ्या लाचखोरीच्या आरोपामुळे वन विभागासह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सर्वंकष तपास छत्रपती संभाजीनगर एसीबीकडून सुरू असून, तपासादरम्यान आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
