एक कोटींचा मुद्देमाल जप्त; तिघांविरुद्ध बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा
बीड दि.4 : बीड ग्रामीण पोलिसांनी अवैध गौण खनिज साठवणूक व वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत जेसीबी, दोन हायवा टिप्परसह तब्बल १ कोटी २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास सोनवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
मंगळवारी (दि. ४) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बहीरवाडी शिवारातील निलेश हॉटेललगतच्या मोकळ्या जागेत जेसीबीच्या साहाय्याने शासनाची रॉयल्टी न भरता विनापरवाना वाळू व मुरूमाची साठवणूक करून त्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार एपीआय देविदास सोनवळे यांनी तातडीने पथकासह छापा टाकला. या कारवाईत महेश मच्छिंद्र शिंदे (रा.भावनवाडी) याच्या ताब्यातील ४० लाख रुपयांचा जेसीबी, सुदाम कल्याण सोलनकर (रा. शहाजानपूर चकला) याच्या ताब्यातील वाळूने भरलेला सुमारे ३० लाख १५ हजार रुपयांचा हायवा टिप्पर तसेच ऋषीकेश श्रीराम राख (रा. देवदहिफळ) याच्या ताब्यातील मुरूमाने भरलेला ३० लाख ५ हजार रुपयांचा हायवा टिप्पर असा एकूण १ कोटी २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संकेत घुगे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देविदास सोनवळे, उपनिरीक्षक संकेत घुगे, हवालदार प्रल्हाद भारती, अंमलदार गणेश कांदे, सचिन कापसे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.