पोलिसांच्या कारवाईत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
वडवणी दि.18 : तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी येथे ऊस आणि कापसाच्या पिकाच्या आड गांजाची लागवड केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांच्या कारवाईत गांजाची तब्बल ११६ झाडे आढळून आली. सहा ते सात फूट उंचीच्या या झाडांची किंमत अंदाजे ५० लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.हरिश्चंद्र पिंपरी येथील संदीपान विठ्ठलराव शिंदे (वय ४०) यांच्या शेतात ऊस व कापसाचे पीक आहे. याच पिकांच्या आड गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेतात कारवाई केली असता गांजाची ११६ झाडे आढळून आली. या झाडांची उंची सहा ते सात फूट असल्याचे समोर आले. पोलिसांनी गांजाची झाडे ताब्यात घेतली असून, घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरू होते. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत अंदाजे ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
पंचनामा व वजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुद्देमालाची अधिकृत किंमत स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ऊस-कापसासारख्या पिकांच्या आड गांजाची लागवड करून अमली पदार्थाची निर्मिती करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई डीवायएसपी अशोक अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे, उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नामदास, मोरे, हवालदार राऊत, काकडे, शिनगारे, उबाळे आणि जावळे यांच्या पथकाने केली.
