बीड : वाळू वाहतुकीसाठी 70 हजारांची लाच घेणारा पकडला!

बीड

केशव कदम

दि.18 : जिल्ह्यात अवैध वाळू उपशाचा मुद्दा गाजत असतानाच अवैध वाळू वाहतुकीसाठी सहकार्य करण्याच्या मोबदल्यात 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना गेवराई तालुक्यातील तलाठ्याला छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.18) रंगेहाथ पकडले. विलास राजेंद्र मोराळे असे कारवाई झालेल्या तलाठ्याचे नाव असून ते गेवराई तालुक्यातील खामगाव सज्जा येथे कार्यरत होते.

अवैध वाळू वाहतुकीसाठी सहकार्य करण्याच्या बदल्यात मोराळे यांनी संबंधिताकडे लाचेची मागणी केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोराळे यांना पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर पथकातील भास्कर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी संबंधित तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महसूल विभागातील अधिकार्‍यावर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उपशाचा मुद्दा यापूर्वीच चर्चेत आला आहे. घरकुल लाभार्थ्यांसाठीच्या वाळूसह अवैध वाळू उपशाच्या प्रकरणात महसूल विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. वाळू उपशाप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असतानाच आता अवैध वाळू वाहतुकीला सहकार्य करण्यासाठी तलाठ्याने लाच स्वीकारल्याचे समोर आल्याने महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अवैध वाळू उपशाच्या प्रकरणामुळे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असतांना पुन्हा ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

Tagged