धनंजय देशमुखांची कारागृह महानिरीक्षकांकडे तक्रारप्रतिनिधी। बीडदि.18 ः मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहातून नागपूर किंवा चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात यावे, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कारागृह महानिरीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, कराडला कारागृहात नियमबाह्य सुविधा दिल्या जात असल्याचा तसेच बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधला जात असल्याचा आरोप केला आहे.
बीड जिल्हा कारागृहातील काही अधिकारी व कर्मचार्यांच्या संगनमताने कराडला विशेष सुविधा मिळत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. कारागृह अधीक्षकांच्या दालनाशेजारील खोलीचा वापर, सीसीटीव्ही नसलेल्या हॉस्पिटलच्या खोलीत वारंवार वावर तसेच नियमबाह्य व्हिडीओ कॉल लिंक्स पाठवल्या जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या सर्व बाबींची वरिष्ठ अधिकार्यांमार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. कारागृहातील बंद्यांना नियमानुसार आठवड्यातून दोन वेळा व्हिडीओ कॉलची सुविधा दिली जाते. मात्र, कराडच्या दोन पत्नी आणि मुलाच्या व्हॉट्सपवर वारंवार व्हिडीओ कॉलच्या लिंक्स कशा पाठवल्या जातात, असा सवाल तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. या लिंक्स कोणत्या कर्मचार्यांच्या लॉगिनमधून पाठवण्यात आल्या, याची चौकशी करण्याबरोबरच संबंधित अधिकारी-कर्मचार्यांच्या मोबाइलची फॉरेन्सिक व आयएमईआय तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, कारागृह कर्मचार्यांच्या फोन-पे तसेच अन्य डिजिटल पेमेंट खात्यांतून आर्थिक व्यवहार झाल्याचा आणि सुटलेल्या बंद्यांच्या कार्डवरून कराडने संभाषण केल्याचा संशयही तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.
कोट-यापूर्वीही अशा तक्रारी झाल्या असून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीही चौकशी झाली असून त्यात कोणतेही तथ्य आढळले नाही. वारंवार खोट्या तक्रारी करून प्रशासनाची प्रतिमा मलीन केली जात आहे.राजाराम चांदणे, कारागृह अधीक्षक, बीड————