BEED CIVIL HOSPITAL

कोण खरं अन् कोण खोटं? चौकशी समितीच्या अहवालानंतरच कळणार

बीड


– हातमोजे, टिश्शू पेपर नव्हे तर महिलेच्या पोटात कापशी पट्टी
– ससून रूग्णालयातील डॉक्टरांची टोलवाटोलवी  
प्रतिनिधी । बीड
दि.19 : जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान 19 वर्षीय महिलेच्या पोटात गॉज (कापशी पट्टी) राहिल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे पुन्हा शस्त्रक्रिया करून पोटातून गॉज काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, या प्रकरणात बीड आणि ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या दाव्यांमध्ये विसंगती असल्याने नेमके सत्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


19 वर्षीय संध्या सुरज गायकवाड यांना 1 ऑगस्ट रोजी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी सुमारे 7.20 वाजता त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. घरी गेल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच संध्याला पोटात तीव्र वेदना, उलट्या आणि ताप येऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी तिला वडवणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला बीडमधील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. प्रकृती गंभीर होत असल्याने नातेवाईकांनी 9 ऑगस्ट रोजी तिला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. तेथील उपचाराचा खर्च परवडत नसल्याने 10 ऑगस्ट रोजी तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या तपासण्यांनंतर पोटात मोठ्या प्रमाणात संसर्ग व पू झाल्याचे तसेच आतड्यांना गंभीर इजा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर संध्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात खराब झालेले आतडे आणि गर्भाशय काढावे लागल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. सिझेरियनच्या वेळी पोटात गॉज (कापशी पट्टी) राहिल्यामुळे हा संसर्ग झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. मात्र, या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनी चौकशी समितीसमोर आपली बाजू मांडताना सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात आलेला निर्जंतुक गॉज शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोजून बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे महिलेच्या पोटात गॉज राहिला नसल्याचा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे, ससून रुग्णालयात संध्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेत पोटातून कापशी पट्टी बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बीडच्या डॉक्टरांचा दावा आणि ससूनमधील उपचारादरम्यान समोर आलेली बाब यामध्ये विरोधाभास दिसून येत आहे. बीडच्या डॉक्टरांनी गॉज बाहेर काढला असेल, तर ससूनमध्ये तो आला कुठून? आणि जर बीडमध्येच गॉज राहिला असेल, तर शस्त्रक्रियेनंतर त्याची मोजदाद करताना नेमकी चूक कुठे झाली? या प्रश्नांची उत्तरे आता चौकशी समितीच्या तपासातूनच मिळणार आहेत. त्यामुळे नेमके कोणाचे म्हणणे खरे आणि कोणाचे चुकीचे, याचा उलगडा समितीच्या अहवालानंतरच होणार आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके यांनी बुधवारी स्वतः पुण्यात जाऊन उपचाराधीन संध्या गायकवाड यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांशीही चर्चा केली. त्यामुळे ससूनमधील उपचारांच्या नोंदी आणि वैद्यकीय अहवाल या चौकशीत महत्त्वाचे ठरणार आहेत.

चौकट-
13 जणांचे जबाब नोंदवले
या घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाच्या आदेशाने तीन सदस्यीय चौकशी समिती बुधवारी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. समितीत लातूरचे सहाय्यक आरोग्य उपसंचालक डॉ.संजय ढगे, धाराशिवचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.इस्माईल मुल्ला आणि लातूरचे सर्जन डॉ.शशिकांत देशपांडे यांचा समावेश आहे. समितीने संबंधित दिवशी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांची चौकशी केली. सिझेरियन करणारे डॉक्टर, तसेच 10 परिचारिका अशा एकूण 13 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

चौकट-
ओटीतील प्रत्येक नोंद तपासणार
गॉज प्रकरणाच्या चौकशीत बीड जिल्हा रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमधील प्रत्येक नोंदीची बारकाईने पडताळणी केली जाणार आहे. शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात आलेले गॉज, त्यांची मोजदाद, वापरलेल्या साहित्याची नोंद तसेच शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करण्यात आलेल्या नोंदी तपासल्या जाणार आहेत. यासोबतच ओटी रजिस्टर, संबंधित महिलेची केसशीट, परिचारिकांच्या नोंदी आणि ससून रुग्णालयातील उपचारांचे वैद्यकीय अहवाल यांचीही समितीकडून छाननी केली जाणार आहे. या सर्व नोंदींची सांगड घातल्यानंतर गॉजचा हिशोब नेमका कुठे चुकला आणि या प्रकरणात दोष कुणाचा, याचा उलगडा होणार आहे.
————

Tagged