बीड

फरार, पाहिजेत आरोपी हद्दीमध्ये सापडल्यास ठाणेदाराची खैर नाही

By DHANANJAY JOGDE

August 21, 2026

-आरोपींना जेरबंद करण्यासाठी एसपी नवीनत काँवतांचा उपक्रम

प्रतिनिधी । बीड दि.20 ः पाहिजेत, फरार आरोपी जर जास्तकाळ ठाणेच्या हद्दतीच असल्याची माहिती एसपींना मिळाली, त्यांनी पाठवलेल्या पथकाला सदरील आरोपी सापडला तर संबंधित ठाणेदारावर मात्र कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे. तसेच आरोपीबाबत खोटी माहिती देणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर पोलिस ठाण्यातील कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी सर्व अंमलदारांना विविध टेबलचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मनुष्यबळाचा योग्य वापर करून पोलिस ठाण्यांचे कामकाज अधिक गतिमान करण्याचा कायम पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचा उद्देश असतो. फरार आरोपींच्या शोधाबाबतही एसपी काँवत यांनी पोलिस अधिकार्‍यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. एखादा आरोपी त्याच्या ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती असतानाही संबंधित अधिकारी किंवा कर्मचार्‍याने तो फरार असल्याचे सांगितले, तर वरिष्ठांकडून त्याची स्वतंत्रपणे पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी दुसर्‍या पथकाला संबंधित आरोपीच्या ठिकाणी पाठवून कारवाई करण्यात येईल. दुसर्‍या पथकाला आरोपी त्याच ठिकाणी आढळून आल्यास खोटी माहिती देणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍याची चौकशी करून त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल. तसेच आपल्या हद्दीत आरोपी असूनही त्याच्यावर कारवाई का झाली नाही, याबाबत संबंधित ठाणेदारालाही उत्तर द्यावे लागणार आहे. गंभीर प्रकार आढळल्यास संबंधित ठाणेदाराची उचल बांगडी करण्याचा इशाराच एसपी काँवत यांनी दिला आहे. आरोपी फरार आहे असे सांगून कारवाईपासून पळ काढणे किंवा वरिष्ठांची दिशाभूल करणे यापुढे चालणार नाही. पोलिसांनी दिलेली माहिती अचूक असावी आणि प्रत्येक कारवाईत पारदर्शकता व जबाबदारी निश्चित असावी, यावर एसपी काँवत यांनी भर दिला आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यांच्या कामकाजात शिस्त आणण्यासोबतच गुन्हेगारांविरुद्धच्या कारवाईला अधिक वेग देण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसून येत आहे.

चौकटकाम थांबू नये यासाठी सर्व अंमलदारांना बहुटेबल प्रशिक्षणपोलिस ठाण्यातील क्राइम मोहरील, कॅश मोहरील, डीएसबी, हजेरी मेजर, बर्नेशी, सीसीटीएनएस समन्वयक तसेच पीआय रायटर या सर्व टेबलचे कामकाज अंमलदारांना शिकविले जाणार आहे. सध्या एखाद्या विशिष्ट टेबलचे काम करणार्‍या कर्मचार्‍यालाच त्या कामाची माहिती असते. संबंधित कर्मचारी रजेवर किंवा अन्य कारणाने अनुपस्थित राहिल्यास कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी सर्व अंमलदारांना बहुटेबल प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

कोट प्रत्येक अंमलदाराला ठाण्यातील सर्वच कामकाज आले पाहिजे, एकाच कर्मचार्‍यावर अवलंबून न राहता सर्वांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी बहुटेबल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच आरोपीबाबत वरिष्ठांना चुकीची किंवा खोटी माहिती देणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. फरार, पाहिजेत आरोपी ठाणे हद्दीतच आढळून आल्यास संबसंधितांवर कारवाई केली जाणार आहे.  – नवनीत काँवत पोलीस अधीक्षक, बीड————-