BEED CIVIL HOSPITAL

बीड

सिझेरियननंतर आता सातदिवसांआधी डिस्चार्ज नको

By DHANANJAY JOGDE

August 21, 2026

जिल्हा शल्यचिकित्सकांचे स्त्रीरोगतज्ज्ञांना निर्देश  प्रतिनिधी। बीडदि.20 ः सिझेरियन शस्त्रक्रिया झालेल्या मातेला सात दिवस पूर्ण होण्यापूर्वी डिस्चार्ज देऊ नये, असे कडक निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी बीड जिल्हा रुग्णालयातील सर्व स्त्रीरोगतज्ज्ञ व वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले आहेत. रुग्णांच्या सुरक्षेशी तडजोड अथवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यासोबतच निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या वडवणी तालुक्यातील संध्या गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी रात्री सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, 7 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच 4 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलविण्यात आले. या प्रकरणात शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटात गॉज राहिल्याचा आरोप झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. सिझेरियन झालेल्या मातेला टाके काढण्यापूर्वी किंवा सात दिवस पूर्ण होण्याआधी घाईघाईने डिस्चार्ज देऊ नये. रुग्णाच्या प्रकृतीचे सातत्याने निरीक्षण करून आवश्यक उपचार पूर्ण झाल्यानंतरच डिस्चार्जचा निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

जागा नाहीची सबबखपवून घेणार नाहीरुग्णालयात खाटांची कमतरता असल्याने रुग्णाला लवकर डिस्चार्ज देणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुग्णालयात खाटांची अडचण असल्याने 70 खाटांचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून, त्यानंतरही रुग्णसंख्या वाढल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

नोंदी अचूक ठेवण्याचे निर्देशगंभीर व उच्च जोखमीच्या रुग्णांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासोबतच त्यांच्या उपचारांबाबत घेतलेले निर्णय, शिफारसी आणि शस्त्रक्रियेचा तपशील वैद्यकीय नोंदींमध्ये अचूक नमूद करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णाच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास अहवालाची प्रतीक्षा न करता तातडीने वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांना माहिती द्यावी, तसेच रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांनी परस्पर समन्वय ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे.————