बीड दि.21 : विलास नवनाथ घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांना अटक करावी, आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून घुले कुटुंबीयांना न्याय द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी मागील तब्बल 18 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, मागण्या अद्याप मान्य झाल्या नसल्याने शुक्रवारी (दि.21) जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी समाजबांधवांच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान अनेकांनी संताप व्यक्त करत प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिस यंत्रणा गप्प का आहे? असा सवाल करत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आरोपींवर मोक्का लावावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी काही आंदोलकांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘बजरंग सोनवणे यांनी राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा घेतला नाही तर भाजपमध्ये एक माणूसही दिसणार नाही,’ असा इशारा देण्यात आला. तसेच ‘कातडे घातलेला बजरंग सोनवणे वाघ आहे; खरा वाघ गोपीनाथ मुंडे होते,’ अशी टीकाही यावेळी करण्यात आली. दरम्यान, न्याय मिळाला नाही तर राज्यभरात चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. न्याय मिळेपर्यंत आंदोलनातून मागे हटणार नसल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.सरकारी वकील म्हणून ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची नियुक्ती करावी विलास नवनाथ घुले हत्या प्रकरणात घुले कुटुंबीयांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
तळपत्या उन्हात रस्त्यावर
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर अनेक आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ओबीसी समाजबांधवांनी तळपत्या उन्हात काही तास रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
पोलिसांवर विश्वास नाही
पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही, असा आरोप करत पोलिसांनी ‘नटरंगासारखा खेळ मांडला आहे. पोलिसांनी 50-50 लाख रुपये घेतले आहेत,’ असा गंभीर आरोप केला. तसेच पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचे नाव घेण्यात आले असून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली.
