विलास घुले हत्या प्रकरणातील साक्षीदार उमेश माने गजाआड

बीड

– महिलेवरील अत्याचार प्रकरणात होता फरार

बीड : कदमवाडी येथील एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप असलेला उमेश माने अखेर केज पोलिसांच्या हाती लागला. महिलेवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात दीड महिन्यापासून फरार असलेल्या उमेश माने याला पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी कदमवाडी येथील त्याच्या घरातून अटक केली. उमेश माने हा हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणातील साक्षीदार असल्याने त्याच्या अटकेकडे विशेष लक्ष लागले आहे.

उमेश माने याने एका विवाहित महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केल्याचा आरोप आहे. या व्हिडीओचा धाक दाखवून तो पीडितेवर वारंवार अत्याचार करत होता. तसेच या प्रकाराची वाच्यता केल्यास पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणातूनच २० जून रोजी केज-मांजरसुंबा रोडवरील बळीराजा हॉटेलजवळ पीडित महिलेचे नातेवाईक आणि उमेश माने यांच्यात वाद झाला. यावेळी उमेश माने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्याला वाचवण्यासाठी हॉटेलमालक विलास घुले पुढे गेले. त्यावेळी जमावातील एकाने घुले यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांचा २१ जून रोजी अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर रमेश घुले यांच्या तक्रारीवरून दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या पुरवणीत खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याचेही नाव आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात उमेश माने हा साक्षीदार आहे.

दरम्यान, महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने पीडित महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजातून तीव्र संताप व्यक्त झाला. त्यानंतर १४ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात उमेश माने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एम) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच उमेश माने फरार झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके करत होते. दरम्यान, उमेश माने कदमवाडी येथे लपून बसल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे यांच्यासह बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे, नितीन वारे, राहुल तरकसे, पूजा माके आणि अनिता दगडखैर यांच्या पथकाने गोपनीय पद्धतीने सापळा रचून कदमवाडी येथील घरातून उमेश माने याला ताब्यात घेत अटक केली.

Tagged