maratha arakshan

बीड

बीड जिल्ह्यात 2 लाख 9 हजार 851 जणांना मिळाले कुणबी प्रमाणपत्र!

By Keshav Kadam

September 03, 2026

केवळ 11 हजार 422 प्रमाणपत्रच जात प्रमाणपत्र पडताळणीकडून वैध  केशव कदम । बीडदि.02 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी केलेल्या आंदोलनानंतर कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात वेग आला. आतापर्यंत बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी 2 लाख 9 हजार 872 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 2 लाख 9 हजार 851 जणांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने 10 अर्ज बाद केले आहेत. (beed kunabi pramanpatr news)

कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधितांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. त्यानुसार जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आतापर्यंत 13 हजार 754 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 11 हजार 422 प्रमाणपत्रे वैध ठरविण्यात आली आहेत. तर पडताळणीदरम्यान दोन प्रमाणपत्रे अवैध ठरविण्यात आली असून, 1 हजार 136 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान कुणबी प्रमाणपत्र वितरणाची वाढती संख्या, जात वैधता प्रक्रियेतील प्रलंबित अर्ज आणि प्रमाणपत्रे अवैध ठरविण्याचा मुद्दा यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला पुन्हा एकदा मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाकडून पुढील काळात कोणते निर्णय घेतले जातात? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

बीडमध्ये दोन प्रमाणपत्रे अवैध  कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु असतानाच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने बीडमध्ये दोन प्रमाणपत्रे अवैध ठरवले, तसेच इतर ठिकाणीही काही प्रमाणपत्रे अवैध ठरवले. यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून, त्यांच्या उपोषणाचा बुधवारी पाचवा दिवस आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढत असून, प्रशासनाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.हैदराबाद गॅझेटनुसार457 प्रमाणपत्र वाटपहैदराबाद गॅझेटनुसार 2 सप्टेंबर 2025 पासून कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतरच्या वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकली असता बीड जिल्ह्यात 457 जणांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या प्रक्रियेत एकही अर्ज प्रलंबित राहिलेला नसल्याची माहिती आहे.

कुणबी प्रमाणपत्र मिळाले तरीजात वैधता प्रमाणपत्र महत्वाचेजिल्ह्यात 2 लाख 9 हजार 851 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असले तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळणे हा पुढील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळालेल्या लाभार्थ्यांचे अर्ज जात पडताळणी समितीकडे मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. आतापर्यंत प्राप्त झालेल्या 13 हजार 754 अर्जांपैकी 11 हजार 422 अर्जांवर वैधतेची मोहर उमटली आहे. दोन प्रमाणपत्रे अवैध ठरविण्यात आली असून, 1 हजार 136 प्रकरणे अद्याप समितीसमोर प्रलंबित आहेत.