maratha arakshan

मराठा आरक्षणासाठी 81 तरुणांनी जीवन संपविले !

बीड

80 कुटूंबीयांना शासनाकडून 10 लाखांची मदत, मराठा आरक्षणावर एकदाचा तोडगा निघावा

केशव कदम । बीड
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही वर्षांत बीड जिल्ह्यात अनेक तरुणांनी आपले जीवन संपविले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणांमध्ये कार्यवाही सुरु झाली. मात्र, शासनाकडून आर्थिक मदत आणि नोकरी देण्याची प्रक्रिया सुरु असतानाही आरक्षणाच्या प्रश्नावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्यामुळे समाजातील अस्वस्थता कायम आहे. (maratha arakshan sucide)

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 2023 पासून आजपर्यंत बीड जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींचे एकूण 81 प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 80 प्रकरणांमध्ये संबंधित कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. एक प्रस्ताव अद्याप वरिष्ठ स्तरावर प्रलंबित आहे. आर्थिक मदतीसोबतच शासनाने बलिदान देणार्‍या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचेही आश्वासन दिले होते. त्यानुसार आतापर्यंत पाचपेक्षा अधिक जणांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) नोकरी मिळाल्याची माहिती आहे. तर काही कुटुंबीयांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.


10 लाख मिळाले, पण घराचा
आधार कधीच परत येणार नाही

सरकारकडून आर्थिक मदत मिळणे हा संबंधित कुटुंबांसाठी निश्चितच काही प्रमाणात दिलासा असला, तरी ज्यांनी मुलगा, भाऊ किंवा कुटुंबातील कमावता सदस्य गमावला, त्यांचे दुःख दहा लाखांच्या मदतीने भरून निघणारे नाही. आर्थिक मदत ही सरकारच्या आश्वासनाची पूर्तता असली तरी आत्महत्यांना कारणीभूत ठरणारा आरक्षणाचा प्रश्न कायम राहिल्यास ही समस्या पुन्हा- पुन्हा निर्माण होत आहे.

मराठा आरक्षणावर
एकदाचा तोडगा निघावा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी आंदोलन, उपोषण आणि सरकारसोबत चर्चा केली आहे. मात्र आरक्षणातील सर्व मागण्यांचा विचार करून कायमस्वरूपी, कायदेशीर तोडगा काढणे, तरुणांमध्ये निर्माण झालेली निराशा दूर करणे आणि आरक्षणाच्या प्रश्नासाठी आणखी कोणत्याही कुटुंबावर आपला मुलगा गमावण्याची वेळ येऊ न देणे, हीच आता सर्वात मोठी गरज आहे.

Tagged