बीड-नवगण राजुरी मार्गावरील उकंडा तळ्याजवळ दुर्घटना
बीड : बीड-नवगण राजुरी मार्गावरील उकंडा तळ्याजवळ गुरुवारी (दि. १०) रात्री ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघा जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. कैलास टुले, अक्षय शिंदे आणि ऋषिकेश फुलझळके अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने नवगण राजुरी गावावर शोककळा पसरली आहे.
गुरुवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास तिघे मित्र दुचाकीवरून गावाकडे जात होते. उकंडा तळ्याजवळ पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला.दरम्यान, पुलाच्या कामाच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक दिशादर्शक फलक, रेडियम पट्टे अथवा इतर सुरक्षाव्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बीड-नवगण राजुरी मार्गाचे राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. बांधकामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था करणे अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा अपघात घडल्याचा आरोप होत आहे. या मार्गावर यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संबंधित गुत्तेदार व बांधकाम विभागाने तातडीने सुरक्षाव्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.