बीड

बेपत्ता ग्रामसेवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला!

By Keshav Kadam

September 11, 2026

गेवराई दि.11 : गेवराई तालुक्यातील रेवकी-देवकी व बागपिंपळगाव ग्रामपंचायतीचा पदभार सांभाळणारे ग्रामसेवक तुकाराम भागवत घोलप हे गेल्या पाच-सहा दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान, बीड शहरालगतच्या सह्याद्री देवराई परिसरात शुक्रवारी (दि. ११) दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

ग्रामसेवक तुकाराम घोलप हे काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह संबंधितांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. शनिवारी सह्याद्री देवराई परिसरात नागरिकांच्या निदर्शनास एक मृतदेह आल्यानंतर ही घटना समोर आली. या मृतदेहाची ओळख तुकाराम घोलप यांची असल्याचे सांगण्यात येत आहे. घोलप यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत विभागात शोककळा पसरली आहे. ते रेवकी-देवकी तसेच बागपिंपळगाव ग्रामपंचायतीचा पदभार सांभाळत होते. त्यामुळे त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याची आणि त्यानंतर मृतदेह आढळून आल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. घोलप यांनी टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा उलगडा पोलिसांच्या तपासानंतरच होणार आहे. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.