बीड

मीटर बदलण्यासाठी स्वीकारली 13 हजाराची लाच!

By Keshav Kadam

September 27, 2026

–जालना एसीबीची परळीत कारवाई

प्रतिनिधी । बीड

दि.27: वीज मीटर फॉल्टी असल्याचे सांगून नवीन मीटर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 13 हजार रुपये स्वीकारताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी (दि.27) दुपारी 1.10 वाजता परळी शहरातील जिरगे नगर डीपीजवळ करण्यात आली.

अरुण सुरेश गिते (वय 31) असे लाचखोराचे नाव आहे. गिते महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असून, त्याची नियुक्ती अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी, परळी यांच्या कार्यालयात आहे. तक्रारदार हे 50 वर्षीय खासगी नोकरदार आहेत. 25 सप्टेंबर रोजी गिते यांनी तक्रारदारांच्या घरातील वीज मीटर काढून नेले. त्यानंतर तक्रारदार महावितरण कार्यालयात गिते यांना भेटले असता, मीटर फॉल्टी असल्याचे सांगून नवीन मीटर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी 15 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. जिरगे नगर डीपीजवळ पंचांसमक्ष तक्रारदाराकडून 13 हजार रुपये लाच स्वीकारताना अरुण गिते यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जालना येथील एसीबीचे उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार गजानन घायवट, मनोहर भुतेकर, गजानन कांबळे, शिवलिंग खुळे, गणेश चेके व चालक पोलीस नाईक कापसे यांचा समावेश होता.-

—————