आठ हजारांची लाच घेताना लाचखोर पकडला!

बीड

बीड : केशव कदम

दि.8 : जिल्ह्यात एसीबीच्या कारवाईने खळबळ उडाली आहे. तक्रारदाराच्या जमिनीची फेरफार नोंद घेण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना उमरी येथील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी परमेश्वर फलके यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. ८) दुपारी केज तहसील कार्यालय परिसरात रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराच्या जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी तलाठी परमेश्वर फलके यांनी दोन दिवसांपूर्वी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार बीड एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी केज तहसील कार्यालय परिसरात लाचेची रक्कम स्वीकारण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. दुपारी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना परमेश्वर फलके यांना पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, अनिल शेळके, अविनाश गवळी, पांडुरंग काचंगुंडे तसेच चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.

Tagged