Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीडमध्ये खळबळः सेवानिवृत्त क्लासवन अधिकार्‍यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात

केशव कदम – बीड
दि.8 ः जिल्ह्यात सकाळी तलाठ्याला लाच स्वीकारताना पकडल्यानंतर काही तासांतच बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुसरी मोठी कारवाई केली. गायींच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना तालुका पशुधन पर्यवेक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात सेवानिवृत्त क्लासवन अधिकार्‍यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पाटोदा तालुक्यात करण्यात आली.

डॉ. धर्मराज बयाजी कदम हे पाटोदा पंचायत समिती अंतर्गत तालुका पशुधन अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळातील गायींच्या फाईलवर स्वाक्षरी करून मंजुरी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार तालुका पशुधन पर्यवेक्षक शांतीलाल बाबुराव धुदावडे यांनी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे समोर आले. तर खासगी व्यक्ती दत्ताराम तुकाराम साठे याने लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. या प्रकरणात डॉ. धर्मराज कदम, शांतीलाल धुदावडे आणि दत्ताराम साठे यांच्याविरुद्ध पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकाच दिवशी एसीबीच्या दोन कारवायांमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version