लॉकअपमध्ये आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न!

बीड

पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

बीड दि. 10 : तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीने लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संबंधित आरोपीचे प्राण वाचले. त्याला उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

बालाजी शिंदे (वय २२, रा. वाशी) असे या आरोपीचे नाव आहे. आवादा कंपनीतील चोरीच्या प्रकरणात त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेकनूर पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये असताना शनिवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास बालाजी शिंदे याने पांघरुणाच्या रगचा दोरा उसवून तो गळ्याभोवती आवळत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाल केली. त्यांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. त्यानंतर बालाजीला तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Tagged