केशव कदम – बीड
दि.14 : जिल्ह्यातील बहुचर्चित भूसंपादन मावेजा गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (दि.१४ ऑक्टोबर) जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात अटक झाल्यानंतर मागील काही महिन्यांपासून पाठक कारागृहात होते.
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी देण्यात येणाऱ्या १५४ प्रकरणांमध्ये मागील तारखांचे आदेश तयार करून एकूण २४१ कोटी ६२ लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला होता. त्यातील ७३ कोटी ४ लाख रुपये वितरित करण्यात आले होते. या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह अन्य संबंधित व्यक्तींविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एसआयटीने पाठक यांना लातूर येथून अटक केली होती. तपासादरम्यान भूसंपादनाशी संबंधित कागदपत्रे, कथित बनावट आदेश, डिजिटल पुरावे आणि काही मूळ फाइल्सबाबत तपास यंत्रणांनी संशय व्यक्त केला होता. पाठक यांना जामीन मिळाल्याने त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा न्यायालयीन दिलासा मानला जात आहे.