बीड

बाँडच्या चढ्या दराने विक्रीवर बीड एसीबीचा पहिल्यांदा दणका!

By Keshav Kadam

October 17, 2026

केशव कदम – बीडदि.१७ : कुठल्याही कामासाठी अधिकचा मोबदला घेण्याची अनेकांना सवय लागली आहे. जिल्ह्यात मुद्रांक बाँडची चढ्या दराने विक्री होत असल्याच्या चर्चांदरम्यान बीड एसीबीने गेवराईत कारवाई केली आहे. मागील तारखेचा 500 रुपयांचा बाँड तक्रारदाराला तब्बल ३ हजार ५०० रुपयांना विकल्याप्रकरणी एका 70 वर्षीय बाँड विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. शनिवारी (दि.17) गेवराई तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अंकुश सखाराम पाचपुते (वय 70, रा. बेदरे गल्ली, गेवराई) असे संबंधित बाँड विक्रेत्याचे नाव आहे. तक्रारदाराला मागील तारखेचा 500 रुपयांचा बाँड ३ हजार ५०० रुपयांना विक्री केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी बीड एसीबीने कारवाई केली. यासंदर्भात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात बाँडची छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याचा प्रकार सर्रास घडत होता. एसीबीने केलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्यासह हवालदार मच्छिंद्र बिडकर, अमोल खरसाडे आणि चालक अंबादास पुरी यांनी केली.