वडिलांच्या फिर्यादीवरुन शिक्षकावर गुन्हा
प्रतिनिधी । गेवराई
दि.22 ः वसतीगृहातील शिक्षकाकडून वारंवार त्रास दिला जात असल्यामुळे एका 13 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थ आबासाहेब खरात (वय 13, रा.कवडगाव, ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रतापकाका ढाकणे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील हिंद वसतिगृहात तो राहत होता. समर्थ सातवीत, तर त्याचा भाऊ साई हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता. या वसतिगृहात कार्यरत असलेले शिक्षक सुभाष घुगे हे मागील काही दिवसांपासून समर्थला वारंवार विनाकारण त्रास देत असल्याचे त्याने वडिलांना सांगितले होते. दरम्यान, सततच्या त्रासाला कंटाळून समर्थने बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी दुपारी वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी ठाण्यात ठिय्या मांडला होता. तसेच नातेवाईकांनी पाथर्डी येथे शवविच्छेदन करण्यास नकार दिल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर येथे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे घटनेनंतर दुसर्या दिवशीही शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. या घटनेमुळे वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांशी होणारे वर्तन आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातात का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करुन सत्य समोर आणावे आणि दोषी आढळणार्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
