- सोन्याची साखळी सीटखालीच सापडल्याचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा; वैजापूर न्यायालयाचा निर्णय
बीड | प्रतिनिधीनागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर चालकाला मारहाण करून लूट केल्याच्या कथित प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील चारही आरोपींना वैजापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. आरोपी हे बीड जिल्ह्यातील असल्यामुळे या गंभीर प्रकरणाची उच्च पातळीवर दखल घेतली गेली होती. वैजापूर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी फौजदारी जामीन अर्ज क्रमांक १०७/२०२६ वर हा निकाल दिला आहे.
२६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्रमांक १८ जवळ ही कथित घटना घडली होती. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. ५५९/२०२६) दाखल करण्यात आला होता. महामार्गावर वाहन अडवून चालकाला मारहाण करणे आणि गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात ठेवण्यात आला होता. सर्व आरोपी बीड जिल्ह्यातील असल्याचे समोर आल्याने राज्यभरात या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली होती, ज्याची स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेतली होती. न्यायालयाने प्रत्येक आरोपीला १५ हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचा एक जामीनदार सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, खटल्यातील साक्षीदार किंवा पुराव्यांवर कोणत्याही प्रकारे प्रभाव टाकू नये, अशा सक्त अटी घालण्यात आल्या आहेत.या प्रकरणात बचाव पक्षाची बाजू ॲड. शशिकांत शेकडे आणि ॲड. विशाल थावरे यांनी यशस्वीपणे मांडली, तर त्यांना ॲड. पृथ्वीराज धाकणे, ॲड. अमोल गायकवाड, ॲड. व्यंकटेश हिंगमिरे आणि ॲड. रोहित नरवडे यांनी सहकार्य केले.
बचाव पक्षाचा प्रभावी युक्तिवाद
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपींकडून कोणतीही चोरीची वस्तू जप्त करण्यात आलेली नाही. तसेच, ओळख परेडदरम्यान तक्रारदार चालकाला आरोपींची ओळख पटविता आली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तक्रारदाराने न्यायालयात दिलेल्या जबाबावरून कथितरीत्या लुटलेली सोन्याची साखळी इतरत्र कुठेही नसून, त्याच्याच वाहनातील चालकाच्या सीटखाली सुरक्षित असल्याचे समोर आले. सरकारी पक्षाने तपास अद्याप सुरू असल्याचे सांगत जामिनाला तीव्र विरोध केला; परंतु उपलब्ध कागदपत्रे, परिस्थिती आणि पुराव्यांचा सांगोपांग विचार करत न्यायालयाने चारही आरोपींना अटी व शर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला.