pratap patil and satish chavhan

पदवीधरांची नाराजी केवळ सतीश चव्हाणांवरच नाही तर सरकार विरुद्ध देखील

बीड

दत्ता देशमुख : बीड
दि. २८ : मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणुक सुरुवातीपासून गाजली ती ‘नाराजी’ या एका मुद्द्यावर. १८ वर्षे मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सतीश चव्हाण satish chvhan यांच्या कामाची चिकीत्सा करण्यात आली. पण, मतदारांचा पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांचा कौल आणि पुणे पदवीधर निवडणुकीतील मतांचा कौल पाहता ही नाराजी केवळ एकट्या सतीश चव्हाण यांच्या विरुद्ध नाही तर सरकार विरुद्ध देखील असल्याचे नाकारता येणार नाही. ‘चाणाक्ष’ मंडळी सतीश चव्हाणांवर ‘राज’ आणून मोकळे होईल, पण सामान्यांत असलेली खदखद, वाढती महागाई, दुष्काळ आणि कुठल्याही आंदोलन किंवा प्रकरणांत स्पष्टीकरण देण्याऐवजी त्यांच्यावर तुटून पडण्याची आणि समोरच्यालाच उघडे पाडण्याची सवय सरकारने बदलण्याची गरज या निकालातून दिसत आहे.


मराठवाडा पदवीधर मतदार संघातून स्वतंत्र निवडणुक लढविण्यासाठी भाजप मागच्या वर्षभरापासून तयारी करत होते. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnvis, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ravindra chvhan, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेchnadrashekhar bawankule यांनीही छत्रपती संभाजी नगरमध्ये तयारीच्या बैठकांना हजेरी लावली. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली.

राज्यात महायुतीची सत्ता आणि मतदार संघात या तीन पक्षांचे ४१ आमदारांसह पंकजा मुंडे pankaja munde, अतुल सावे atul save, मेघना बोर्डीकर meghana bordukar, संजय सिरसाट sanjay sirsat असे चार मंत्री. स्वत: सतीश चव्हाण यांना तीन वेळा विजयाचा अनुभव, संस्थांचे जाळे आणि मराठवाडाभर विस्तारलेली त्यांची स्वत:ची कार्यकर्त्यांची फळी आणि मतदारांची नोंदणी अशा महायुतीकडे अनेक जमेच्या बाजू. दुसरीकडे महाविकास आघाडीत बेबनाव ही देखील महायुतीसाठी जमेची बाजू. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कडून डॉ. प्रतापसिंह पाटील prati patil यांना रिंगणात उतरविल्यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) देखील दिलीप घुगे यांचा अर्ज कायम ठेवला.

मात्र, निवडणुकीची सुरुवातच ‘नाराजी’ या मुद्द्याभोवती झाली आणि शेवटही याच मुद्याने झाली. आता चव्हाण विरुद्ध डॉ. पाटील असे गणित मांडले तर चव्हाणांना पाटील देखील ‘हम भी कुछ कम नही’ असेच आहेत. त्यांचे वडील डॉ. वेदप्रकाश पाटील यांच्या कर्तृत्व आणि पुण्याईने या कुटुंबाने देखील कळंब ते परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यांत शिक्षण संस्था, रिअल इस्टेट, राजकारण, समाजकारणात आपले भक्कम पाय रोवलेले आहेत. बंधू डॉ. आनंद पाटील संघटन आणि व्यवस्थापनात माहिती असून दुसरे बंधू डॉ. राहुल पाटील परभणीतून तिसऱ्यांदा आमदार आहेत. एकूणच पाटील कुटुंब देखील मराठवाडाभर राबता ठेवून असले तरी आज मराठवाड्यातील पक्षाची ताकद पाहता एक खासदार आणि एक आमदार अशी आहे. तर, राजकीय दृष्ट्या या निवडणुकीच्या अंगाने विचार केला तर डॉ. प्रतापसिंह पाटील कधी मराठवाडाभर फिरलेले नव्हते ना या निवडणुकीसाठी त्यांनी मतदान नोंदणी केली. पण, नाराजीच्या घोड्यावर स्वार झालेले डॉ. पाटील यांनी लोकांमध्ये गेल्यानंतर कायम हसतमुख चेहरा, सर्वांशी संवाद असा साधेपणा कायम ठेवला.

राहीला प्रश्‍न नाराजीचा तर, नाराजी केवळ सतीश चव्हाण यांच्याबद्दलच होती असे नाही तर त्यात सरकारबद्दलच्या नाराजीचाही महत्वाचा मुद्दा आहे. पदवीधरांचे प्रश्‍न केवळ सतीश चव्हाणांशी संबंधीत नसून ते सरकारच्या धोरणाचा भाग आहे. मात्र, नारळ कोणाच्या डोक्यावर फोडायचे ते सतीश चव्हाण असे निमित्त होऊ शकते. तरुण असो वा कुठलाही घटक त्याच्या मागण्यांना प्रतिसाद, आंदोलनानंतर त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यातले कच्चे दुवे कसे शोधता येतील, त्यांच्याच अंगावर कसे जाता येईल, यासाठी असलेली प्रवक्त्यांची वाचाळ बडबड त्या काळापुरती गोड वाटत असली तरी संधी आल्यानंतर असे उत्तर मिळते, याचा धडा सतीश चव्हाण यांच्याबरोबर आता सरकारनेही घेण्याची गरज आहे.

Tagged