धनेश्वरी बोरगाव ते कतृत्वाने मराठवाडाभर विस्तार; असा आहे डॉ. पाटील घराण्याचा प्रवास (Dr. Pratapsingh Patil Family History)

बीड

दत्ता देशमुख

बीड : यापूर्वी राजकीय वर्तुळात फारसे कधी न दिसलेले डॉ. प्रतापसिंह पाटील मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जायंट किलर (Giant Killer) ठरले. या मतदार संघातील हुकमी एक्का मानल्या जाणाऱ्या सतीश चव्हाण यांचा त्यांनी पराभव केला. राजकीय दृष्ट्या दुबळ्या असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीवर त्यांनी ताकदवान आणि सत्ताधारी महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा पराभव केला. मात्र, जसे सतीश चव्हाण तुळजापुर ते छत्रपती संभाजीनगर आले. तसेच, डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या घराण्याचाही असाच कतृत्वाचा इतिहास आहे.

धनेश्वरी बोरगाव (ता. कळंब, जि. धाराशिव) येथून सुरू झालेली वाटचाल त्यांचे वडिल डॉ. वेदप्रकाश पाटील यांच्या कतृत्वाने आज परभणी, बीड, जालना, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांपर्यंत पोहोचली आहे. कृषी, शिक्षण, संस्था व्यवस्थापन, वैद्यकीय व्यवसाय, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत या कुटुंबाची मराठवाडाभर घोडदौड आहे. याच डॉ. वेदप्रकाश पाटील यांचे डॉ. प्रतापसिंह पाटील जेष्ठ चिरंजीव आहेत. तर, परभणीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आमदार डॉ. राहूल पाटील आणि डॉ. आनंद पाटील हे डॉ. प्रतापसिंहांचे धाकटे बंधू आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही भावंडे एमबीबीएस (MBBS) डॉक्टर आहेत.

पाटील कुटुंबाच्या कतृत्वाचा मराठवाडाभर विस्तारलेला वटवृक्ष हा सहाजिकच डॉ. वेदप्रकाश पाटील यांच्यामुळे. सधन पाटील कुटूंबातील डॉ. वेदप्रकाश पाटील यांना शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी कृषी क्षेत्रातच शिक्षण आणि करिअर (Career) केले. कृषी महाविद्यालयात प्राध्यापक ते कृषीच्या विविध संशोधनातून त्यांनी कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुपदापर्यंतचा प्रवास केला. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच छत्तीसगडमधील रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिले. याशिवाय असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या (Association of Indian Universities) अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.

कृषी शिक्षण क्षेत्रातील या वाटचालीमुळे त्यांना शैक्षणिक संस्थांचे कामकाज, मनुष्यबळ व्यवस्थापन, अभ्यासक्रमांची आखणी आणि संस्थांच्या प्रशासकीय रचनेचा व्यापक अनुभव मिळाला. याच अनुभवाचा उपयोग पुढे शैक्षणिक संस्था उभारण्याच्या आणि त्यांचा विस्तार करण्याच्या यशस्वी प्रयत्नांत केला. डॉ. वेदप्रकाश पाटील यांनी श्री धनेश्वरी मानव विकास मंडळ आणि श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ या संस्थांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, विविध व्यावसायिक, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या संस्थांची उभारणी केली. पुढे या वटवृक्षाचा विस्तार करण्यात त्यांच्या मुलांचेही कतृत्व असून आता एमबीबीएस (MBBS), बीएएमएस (BAMS) महाविद्यालयांची भर पडली असून पाटील कुटूंबियांच्या संस्थांची धाराशिव, परभणी, जालना, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर आदी विविध भागांत दिड हजार महाविद्यालये आहेत.

दरम्यान, डॉ. वेदप्रकाश पाटील परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरु असल्याने पाटील कुटूंबियांचे वास्तव्य परभणीत होते. याच काळात डॉ. राहूल पाटील महाविद्यालयीन जिवनापासूनच संघटन आणि महाविद्यालयीन राजकारणाकडे वळले. पुढे शिवसेनेने त्यांना संधी दिली आणि त्यांनी विधानसभेत धडक मारली. विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत प्रतिकुल राजकीय परिस्थितीत देखील डॉ. राहुल पाटील यांनी तिसऱ्यांदा परभणीतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) भगवा फडकविला. डॉ. आनंद पाटील हे शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाचे काम पाहत असले तरी त्यांचे विविध घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

डॉ. प्रतापसिंह पाटील यांनीही संस्थांच्या व्यवस्थापनाबरोबरच सुरुवातीला रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रात वावर वाढविला. त्यामुळे राजकारणातल्या विविध पक्षांच्या दुसऱ्या फळीसोबत त्यांचे जवळचे संबंध आले. उच्चशिक्षित पार्श्वभूमी असूनही सर्वांशी सहज संवाद, सतत हसतमुख, प्रत्येकाची ख्याली – खुशाली विचारण्यामुळे त्यांचा मित्रपरिवार कायमच वाढत गेलेला आहे. दरम्यान, त्यांनी यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविल्या असल्या तरी त्यांनी यापूर्वी फारसे राजकीय शत्रु निर्माण केलेले नव्हते. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर या पक्षाने नगर पालिका निवडणुका स्वतंत्र लढविण्याचे धाडस त्यांनी करुन दाखविलेले आहे.

मराठवाडाभर सग्यासोयऱ्यांचे जाळे घट्ट (Political Connections)

पाटील कुटुंबाचा संस्थांच्या माध्यमातून जसा मराठवाडाभर विस्तार आहे. तसेच त्यांच्या नातेसंबंधांचे जाळेही मराठवाडाभर सर्वत्र आणि घट्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या राजकारण आणि सहकार क्षेत्रात मालक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार राजन पाटील हे डॉ. वेदप्रकाश पाटील यांचे मेहुणे व डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे सख्खे मामा आहेत. बीड जिल्ह्याच्या राजकारणात भीष्माचार्य अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शिवाजीराव पंडित हे डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे सख्खे काका आहेत. तर, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंह पंडित आणि जयसिंग पंडित हे त्यांचे मावस भाऊ आहेत. जालना जिल्ह्यातील राजकारणात स्वतंत्र अस्तित्व असलेले विलासराव खरात यांच्याशीही पाटील कुटुंबाचे नातेसंबंध आहेत. परभणी जिल्ह्यातील राजेश विटेकर आणि जामकर हे दोघेही डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे मेहुणे आहेत. तर, हिंगोली जिल्ह्यातील भाऊसाहेब गोरेगावकर हे त्यांचे आतेमामा आहेत. नांदेड जिल्ह्यातील आमदार राजेश पवार देखील त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. डॉ. राहुल पाटील यांच्या सासुरवाडीकडून माजी मंत्री बदामराव पंडित यांच्याशी नातेसंबंध आहेत. तर, राजन पाटील यांच्याकडून डॉ. प्रतापसिंह पाटलांचे राहूल मोटे यांच्यासोबतही नातेसंबंध आहेत. वरिल बडी राजकीय घराण्यांतील मंडळींचे राजकीय वजन आणि संस्थांचे जाळेही असल्याने त्याचा फायदा डॉ. पाटील यांना झाल्याचे नाकारता येणार नाही.

Tagged