-शेतकरी, शेतमजूर, वाहनचालक संकटात; महोत्सवावरील खर्च मदतकार्यासाठी करावा
केशव कदम । बीड
दि.28 : बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, वाहनमालक, वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहे. असे असतांना महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणार्या दिशा रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-2027 बाबत प्रादेशिक परिवहन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संवेदनशील निर्णय घेण्याची गरज आहे. सध्याच्या संकटाच्या काळात भव्य आयोजन आणि उत्सवावर खर्च करण्याऐवजी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या दिशा रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 8, 9 आणि 10 जानेवारी 2027 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. आयोजनाची पूर्वतयारी आणि नियोजन पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असून, अधिकारी व कर्मचार्यांनी उत्साहाने या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, एका बाजूला दुष्काळाच्या झळा सोसणारा शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. शेतीतील उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण होत असताना त्यांच्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे, इंधन, वाहनांची देखभाल, विमा, कर्जाचे हप्ते आणि वाढत्या खर्चामुळे वाहनमालक व वाहनचालकांनाही आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. संकटाच्या काळात उत्सवापेक्षा माणुसकी, दिखाव्यापेक्षा सामाजिक बांधिलकी आणि खर्चापेक्षा जनहिताला प्राधान्य देणारा निर्णय प्रादेशिक परिवहन विभाग छत्रपती संभाजीनगर घेणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे प्रशासनाकडूनच मदतीचे
आवाहन अन् दुसरीकडे उधळपट्टी
दुष्काळी परिस्थितीत सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात असताना शासकीय विभागांनीही सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून देणे अपेक्षित आहे. सार्वजनिक निधीचा वापर करताना जनतेच्या अडचणी आणि स्थानिक परिस्थिती यांचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रस्तावित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनाचा खर्च, त्याची आवश्यकता आणि त्यातून होणारा सार्वजनिक लाभ यांचा फेरआढावा घेण्याची गरज असून होणारी उधळपट्टी थांबवणे महत्वाचे आहे.
दुष्काळग्रस्तांसाठी उपक्रम राबवावाछत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन विभागाने केवळ महोत्सवाच्या आयोजनापुरते मर्यादित न राहता, सामाजिक दायित्वाच्या भावनेतून दुष्काळग्रस्त भागांमध्ये मदतकार्याला हातभार लावण्याचा विचार करावा. संबंधित नियमांच्या चौकटीत राहून स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने पाणी, चारा, अन्नधान्य किंवा गरजू कुटुंबांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधता येऊ शकतो.
—————-
