दत्ता देशमुख
बीड : मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणुक मावळते आमदार सतीश चव्हाण यांच्या नाराजीभोवती फिरली आणि निकालही चव्हाणांना ‘नाराज’ करणाराच लागला. मतदारांनी मोठ्या अपेक्षेने डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यावर विश्वास टाकून त्यांना भसघोस मतदानही दिले. डॉ. पाटील देखील पहाटे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडून विजयाचे प्रमाणपत्र हाती पडले आणि लागलीच दुपारी त्यांनी पदवीधर मतदारांचा महत्वाचा मुद्दा हाती घेत विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी कुटुंबांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. या संकटाची झळ उच्चशिक्षण घेणाऱ्या आणि एमपीएससी (MPSC), यूपीएससी (UPSC) सह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पात्र पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा चार हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे. गुरुवारी (दि. २९) त्यांनी याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे.मराठवाडा पदवीधर मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आणि मावळते आमदार सतीश चव्हाण यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Ncp sp) पक्षाकडून डॉ. प्रतापसिंह पाटील (pratapsinh patil) रिंगणात होते. सर्वांशी हसतमुखाने संवाद, साधे बोलणे, साधी राहणी आणि त्यांचा सर्वांमध्ये मिसळण्याचा स्वभाही मतदारांना आवडला. सतीश चव्हाण यांच्या नाराजीच्या मुद्द्यावर आपण काय करणार, कोणत्या जिल्ह्यात किती दिवस भेटणार, कोणत्या वारी भेटणार असा जाहीरनामाच त्यांनी प्रसिद्ध केला. एकिकडे महायुतीची सत्ता ४५ आमदार, तीन मंत्री आणि तीन विजयाचा अनुभव असलेले सतीश चव्हाण यांच्या विरुद्ध डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा पक्ष राजकीय ताकदीने दुबळा असूनही मतदारांनी मात्र त्यांच्या पारड्यात मतांची ताकद टाकली. लागलीच पाटील यांनीही पदवीधरांच्या अपेक्षांना उतरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मंगळवारी (दि. २७) सकाळी सुरु झालेली मतमोजणी गुरुवारी (दि. २९) पहाटेपर्यंत सुरु होती. पहाटे डॉ. पाटलांच्या हाती निवडणुकीत विजयाचे प्रमाणपत्र पडले आणि त्यांनी दुपारी पदवीधरांचा महत्वाचा प्रश्न हाती घेतला.
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाने स्वतंत्र योजना सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अन्य शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. निवास, भोजन, अभ्यासिका, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याचा खर्च भागवताना या विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. त्यातच खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि शेतीच्या उत्पन्नात झालेली घट यामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. घरची आर्थिक ओढाताण आणि शहरातील वाढता शैक्षणिक खर्च यांचा ताळमेळ घालताना अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होत आहे. काहींच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीत खंड पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना खीळ बसू नये, यासाठी शासनाने विशेष आर्थिक सहाय्य द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

