Site icon कार्यारंभ लाईव्ह

शिरूरमध्ये मतदार यादीत बोगस मतदारांची नावे; एसआयआर प्रक्रियेत घोळ!

–भाजप पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची नावे, घर गाड्यासारखे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे तोंड काळे कर- महेबुब शेख

बीड दि.5 : शिरूर शहरातील मतदार यादीत तब्बल ६२५ बाहेरील मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केला आहे. एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता सुरू असून, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची बोगस नावे मतदार यादीत समाविष्ट केल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस नावे वगळावीत, अशी मागणी त्यांनी केली. गुरुवारी (दि. ५) बीड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, प्रदेश प्रवक्ते प्रा. शिवराज बांगर, युवक प्रदेश सचिव निलकंठ वडमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महेबुब शेख म्हणाले की, शिरूरमध्ये मतदार यादीत बोगस नावे वाढविण्याची चढाओढ सुरू आहे. उदाहरणार्थ, शिवाजी एकनाथ पवार हे झापेवाडी येथे वास्तव्यास असून, तेथे त्यांची नावे असतानाही त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची नावे शिरूर शहरातील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अशाच प्रकारे अन्य अनेक मतदारांची नावे त्यांच्या मूळ ठिकाणी असतानाही शिरूरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या अनियमिततेबाबत शिरूर तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या; मात्र बीएलओंना सांगतो, असे उत्तर देऊन प्रशासनाकडून जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बोगस आधारकार्ड, पीटीआर आणि रेशनकार्ड तयार करून मतदार नोंदणीसाठी त्यांचा वापर होत असल्याचा दावाही त्यांनी केला. अगदी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावानेही बोगस आधारकार्ड तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

शिरुर तहसीलदार घोळवे बोगस अधिकारी

तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या कार्यपद्धतीवरही शेख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चुकीच्या कामांना पाठीशी घातले जात असून, नेमके कोणाच्या दबावाखाली प्रशासन काम करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीही बोगस मतदारांची नावे समाविष्ट झाल्याच्या तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे ते म्हणाले. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. मतदार नोंदणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची काटेकोर तपासणी करावी, संशयास्पद नोंदी व शिक्क्यांची पडताळणी करावी आणि बोगस नावे तत्काळ वगळावीत, अशी मागणी शेख यांनी केली.

अन्यथा प्रशासनाला काळे फासू प्रशासनाने बोगस मतदार नोंदणीचा प्रकार तातडीने थांबवावा. अन्यथा आज महात्मा गांधींच्या मार्गाने सांगत आहोत, उद्या भगतसिंग यांच्या भाषेत सांगू, प्रशासनाला काळे फासू असा इशाराही महेबुब शेख यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Exit mobile version