Site icon कार्यारंभ लाईव्ह

गेवराईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट!

तीन जण गंभीर जखमी-संजयनगर परिसरात एकच खळबळ; दोन महिलांची प्रकृती चिंताजनक

प्रतिनिधी । गेवराई दि.7 : शहरातील संजय नगर परिसरात शनिवारी (दि. 7) सायंकाळी सातच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. बंजारा क्रांती दलाचे नेते लक्ष्मण चव्हाण यांच्या राहत्या घरी झालेल्या या स्फोटात त्यांच्या कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे संजय नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या स्फोटात स्वर्णा लक्ष्मण चव्हाण, जनाबाई राठोड आणि अमोल राठोड हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने गेवराईतील खासगी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. संजय नगर हा शहरातील दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने सिलिंडरच्या भीषण स्फोटाच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच घराला लागलेली आग परिसरातील अन्य घरांपर्यंत पसरू नये, यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाहरुख पठाण आणि भाजपचे नेते शिवराज पवार यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. तसेच जखमींना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न केले. ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सिलिंडरचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

————–

Exit mobile version