Site icon कार्यारंभ लाईव्ह

मराठवाड्यातल्या पहिल्या सीट्रीपलआयटीमध्ये चार कोर्सचे प्रशिक्षण 24 नोव्हेंबरपासून

दत्ता देशमुख : बीड

दि. 19 : जिल्ह्याला विकासाच्या दिशेने नेता यावे, तांत्रिक आणि कौशल्य शिक्षण जिल्ह्यातच मिळावे, तरुणांना रोजगारक्षम शिक्षण आणि पुढे नोकरीच्या संधी मिळाव्यात, ही तत्कालिन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री दिवंगत अजित पवार यांनी स्वप्न पाहून केलेला पाठपुरावा फळाला आला आहे. टाटा टेक्नालॉजी व औद्योगीक विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेतलेला मराठवाड्यातील पहिला सीट्रीपलआयटी (सेंटर फॉन इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग) प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली आहे. दि. 24 नोव्हेंबरपासून 160 विद्यार्थ्यांना चार कोर्सेसचे प्रशिक्षणाची सुरुवात होत आहे. याच दिवशी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार प्रकल्पाचे उदघाटनाचे नियोजन आहे. तत्पुर्वी उद्या शुक्रवारी (दि. 20) या उमेदवारांसोबत चर्चासत्र आणि 23 तारखेला प्रारंभीक मार्गदर्शने केले जाणार आहे. बुधवारी (दि. 18) याचा आढावा घेतला.

दिवंगत अजित पवार यांनी विशिष्ट परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्विकारल्यानंतर त्यांनी नियमित विकास योजनांसह विमानतळ, सिट्रीपलआयटी, तारांगण असे जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देणारे प्रकल्प हाती घेतले. रेल्वेचा विषयही अजेंड्यावर घेत त्यांनी उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी लक्ष घातले आणि घोषणा केलेल्या कालावधीत रेल्वेही धावली. दरम्यान, तरुणांना जिल्ह्यातच कौशल्यपुर्ण आणि रोजगार केेंद्रीत शिक्षण मिळाले तर चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील, हे लक्षात घेऊन त्यांनी टाटा टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने 191 कोटी रुपयांचा सीट्रीपलआयटी प्रकल्पाची घोषणा केली. विहित वेळेत याचे कामही पूर्ण झाले आहे. एमआयडीसीमध्ये 22 हजार स्वेकअर फुट जागेत उभारलेल्या प्रकल्पात शासनाच्या औद्योगीक विकास महामंडळाची भागीदारी आहे.

18 पैकी पहिल्या टप्प्यात चार कोर्स; 160 विद्यार्थी

इंडस्ट्री 4.0, इलेक्ट्रिक वाहने, ऑटोमेशन, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग आणि सीएनसी तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, डिझाइन इंजिनिअरिंग, प्रॉडक्ट डिझाइन, प्रॉडक्ट व्हेरिफिकेशन अँड अ‍ॅनालिसिस, पीएलएम अ‍ॅप्लिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल, मेकॅट्रॉनिक्स, आयओटी, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्रियल रोबोटिक्स, मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्यूशन सिस्टीम आणि अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग अशा 18 कोर्सचे प्रशिक्षण या ठिकाणी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात इलेक्ट्रीकल व्हेईकल, सीएनसी ऑपरेटर प्रोग्रामर, होम अप्लायन्सेस, डायजनरेटेड या चार कोर्सचे प्रशिक्षण सुरु होणार असल्याची माहिती, टाटा टेक्नॉलॉजीचे नितीन राठोड यांनी दिली. सकाळी दोन व संध्याकाळी दोन बॅच असून प्रत्येक ट्रेडला 20 असे 160 विद्यार्थी प्रशिक्षणासाठी निवडले आहेत.

सीट्रीपलआयटीमध्ये रोबोटसह अधुनिक साधने

सीट्रीपलआयटीमध्ये रोबोटसह 100 वर्क स्टेशन, सायकल असेंबली लाईन, लेझर कल्चर, पेंट बुट्स, एक्झीबीशन सीस्टीम, इंटरनेट ऑप्टीना, 3 डी पेेंट्स अशी तांत्रिक प्रशिक्षणाची अधुनिक साधने असल्याचेही श्री. राठोड यांनी सांगीतले. प्रशिक्षणासाठी चार उच्चशिक्षीत ट्रेनरही दाखल झाले आहेत.

चांगल्या कंपन्यांत नोकर्‍यांची संधी

सीट्रीपलआयटी सेंटर टाटा टेक्नॉलॉजी व एमआयडीसीच्या माध्यमातून उभारलेले असल्याने या ठिकाणी तरुणांना उच्च दर्जाचे व मोफत प्रशिक्षण मिळेल. त्याच बरोबर या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे आदी ठिकाणच्या एमआयडीसीमधील विविध उद्योगांत नोकर्‍यांची संधी असेल. —-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या सुचनेप्रमाणे टाटा टेक्नॉलॉजीच्या अधिकार्‍यांसोबत समन्वय साधून पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरु करण्याची तयारी पुर्ण झाली आहे. ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांमधून या निवडी झाल्या. 18 पैकी 4 कोर्सचे प्रशिक्षण सुरु होईल.

– शीला मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी, बीड.

Exit mobile version