BREAKING : महावितरणमध्ये निलंबनाच्या फटाक्यांची लड; 13 कोटी 70 लाखांच्या घोटाळ्यात अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्याचाही समावेश

बीड

दत्ता देशमुख : बीड

दि. 19 : दिवाळीचे फटाके वाजण्याचा मोसम संपला आणि भ्रष्टाचाराने माखलेल्या येथील महाविकरणमध्ये निलंबनाच्या फटाक्यांची जणू लडच पेटली आहे. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता असे सहा जणांवर एकदाच निलंबनाची कारवाई करण्यात आली. महावितरणच्या बीड परिमंडळ कार्यालयांतर्गत देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी वितरित करण्यात आलेल्या 13 कोटी 70 लाख रुपयांच्या निधी वाटप आणि कामांत घोटाळ्याची तक्रार आमदार विजयसिंह पंडित यांनी केली होती. याच्या चौकशीत दोषी आढळल्याने मुंबईच्या प्रकाशगड कार्यालयातून निलंबनाचे आदेश गुरुवारी (दि. 19) दुपारी निघाले.

यामध्ये महावितरणच्या बीड परिमंडळ कार्यालयातील प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे, गेवराईचे उपकार्यकारी अयिंता शाम मोरे, तलवाडा (ता. गेवराई) येथील) सहाय्यक अभियंता चंद्रकांत प्रधान, उमापूर (ता. गेवराई) येथील सहाय्यक अभियंता शाम कुंभार, सिरसदेवी (ता. गेवराई) येथील कनिष्ठ अभियंता महेंद्र गुंजाळ यांचा निलंबनाची कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे. अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपुत यांनी खुद्द कार्यरंभशी बोलताना याला दुजोरा दिला. 2025 – 26 या आर्थिक वर्षात महावितरणच्या बीड विभागीय परिमंडळ कायालयाला देखभाल – दुरुस्तीच्या कामांसाठी 13 कोटी 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र, अधिकार्‍यांनी कंत्राटदारांशी संगनमत करून भ्रष्टाचाराची तक्रार आमदार विजयसिंह पंडित यांनी केली होती. अनेक ठिकाणी कामे न करताच निधी वाटप करण्यात आला होता. भौगोलिक क्षेत्र, ग्राहकसंख्या, विद्युत वाहिन्यांची लांबी, रोहित्रे व उपकेंद्रांची संख्या, मागील वर्षातील खर्च, तांत्रिक आवश्यकता तसेच प्रत्यक्ष देखभाल – दुरुस्तीची गरज या बाबींचा विचार न केल्याने तुलनेने अधिक ग्राहकसंख्या असलेल्या तालुक्यांवर अन्याय केला होता. यामध्ये ठेकेदारांवर भलतीच मेहरनजर दाखविण्यात आली होती.चुकीचे मोजमाप, प्रत्यक्ष कामापेक्षा अधिक रकमेची देयके मंजूर करणे, अशा प्रकारच्या गैरप्रकारांच्या आरोपांची चौकशी कार्यकारी अभियंता नितीन काळे, तसेच कार्यकारी अभियंता सुनिल पावरा यांनी केली होती. याच्या अहवालानंतर हा निलंबनाचा बार उडाला आहे.

भ्रष्टाचार – चुकीची कामे करणार्‍यांची खैर नाही : पंडित

याबाबत सामान्यांच्या व शेतकर्‍यांच्या तक्रारी आल्यानंतर आपण संबंधीतांना समज दिली. मात्र, मोठ्या प्रमाणावर आर्थिक हितसंबंध असल्याने प्रकार थांबला नाही. शेवटी तक्रारीनंतर पाठपुरावा केला व आता ही कारवाई झाली. बीड व गेवराई मतदार संघात कोणत्याही विभागात सामान्यांची अडवणूक, भ्रष्टाचार करणार्‍यांची गय केली जाणार नाही.

– विजयसिंह पंडित, आमदार.

Tagged