अंबाजोगाई

बोगस बियाणे प्रकरणी कारवाई करा : आ.नमिता मुंदडा

By Karyarambh Team

June 22, 2020

केज : जिल्ह्यात हजारो हेक्टरवर विविध कंपन्यांचे पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार तातडीने बोगस बियाणे प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केजच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.

निवेदनात त्यांनी पुढे म्हटले की, जिल्ह्यात या वर्षी वेळेवर पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी दहा बारा दिवसापासून खरीपाच्या पेरणीची सुरुवात केलेली आहे. जवळपास ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सोयाबीन पिकाची पेरणी या वर्षी मोठ्या प्रमाणात सुरु असून, बियाणे उगवणी बाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पाहणी करून, पंचनामे करून कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारा खर्च, बियाणे कंपनीकडून त्वरीत घेऊन द्यावा किंवा शासनाने दुबार पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चाची त्वरीत मदत करावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात अशी मागणी केजच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.