तुमची छाती फाडली तर पवार आणि ठाकरे हे दोघे दिसतील

न्यूज ऑफ द डे राजकारण

मुंबई : सामना अग्रलेखात केलेल्या टीकेचा भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टिका करण्यात आली होती. याचा विखे पाटील यांनी खास शैलीत संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.

विखे पाटील यांनी आपल्या उत्तराचं पत्र ट्विट केलं आहे, सामनाचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझं उत्तर छापाल ही अपेक्षा, अशी विनंती त्यांनी केली आहे. पत्रात पुढे म्हटले की, आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय ते ही लपून राहिलेले नाही. बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्यासारखी लाचारी त्यावेळी नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का? असा टोला विखेंनी राऊतांना हाणला आहे. आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते हे आता लोकांना कळू लागले आहे, असे विखे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

Tagged