india vs chaina

चीनची नवी खेळी ; भारतीय निर्यातीच्या कस्टम क्लियरन्समध्ये अडथळे

देश विदेश

नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवरील वाद आता आर्थिक बाबींपर्यंत येऊन पोहचला आहे. कारण चीनमधून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंचे कंटेनर भारतातील बंदरावर कस्टम विभागाने अडवून ठेवल्याच्या बातम्यांनतर चीननेही भारतातून चीनमध्ये निर्यात होणाऱ्या सामानाचे कंटेनर अडवून ठेवले आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशन FIEO ने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. हाँगकाँग आणि चीनमधील अनेक बंदरांवर भारतातून चीनमध्ये जाणाऱ्या सामानाचे कंटेनर थांबवून ठेवले आहेत.भारतातही या अगोदर आयात झालेल्या चीनी वस्तूंचे कंटेनर भारतीय कस्टमने थांबवून ठेवल्याच्या बातम्या आल्या होत्या. भारतात चीनमधून आयात सामानाचे कंटेनर थांबवून ठेवलेले नाहीत, तर चीनमधील येणाऱ्या वस्तूचं प्रत्यक्ष पाहणी करणं आवश्यक असल्याचे कारण देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून येणाऱ्या कन्साईनमेंटचे निर्जंतुकीकरण झाल्याशिवाय त्यांना देशात प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय भारतीय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र चीनी अधिकाऱ्यांनी या निर्णयाचा गैरअर्थ काढत भारताच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून भारतातून गेलेल्या कन्साईनमेंट थांबवून ठेवल्या आहेत.

भारत आणि चीन यांच्या सीमेवर सध्या तणाव आहे, मागील आठवड्यात भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या हिंसक झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधात बराच तणाव आहे. देशातही चीनमधून आयात होणाऱ्या सामानावर बहिष्कार घालण्याच्या मागण्या होत आहेत. चीनी कंपन्यानी भारतात मिळवलेली पायाभूत सुविधांच्या कामांवरही अनेक ठिकाणी निर्बंध आले आहेत.चीनमधून भारतात येणाऱ्या वस्तूंच्या कस्टम क्लियरन्सला वेळ लागत असल्यामागे कस्टम विभागाकडून देण्यात आलेले कारण संयुक्तिक आहे. कोविड 19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर चीनमधून आयात होणाऱ्या मालाचं फिजिकल स्क्रीनिंग गरजेचे आहे, तरीही चीनच्या कस्टम अधिकाऱ्यांकडून त्याला प्रतिसाद आश्चर्यचकित करणारा आहे. याबाबत अधिकृत पातळीवर चर्चा करुन हा तिढा सोडवला जावा अशी मागणी होत आहे. कारण भारतातून चीनमध्ये निर्यात झालेला माल तिथे बराच काळ थांबून राहिल्याने निर्यात शुल्कात मोठी वाढ होते, त्याचा फटका भारतीय व्यापाराला बसतो. भारतीय बंदरांवर चीनी वस्तूंच्या कस्टम क्लियरन्सला वेळ लागत असल्यामुळेच, प्रत्युत्तरादाखल चीनी अधिकाऱ्यांनी भारतीय माल थांबवून ठेवलाय असं आता जाहीर करणं हा घाईघाईत काढलेला निष्कर्ष असेल असे आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ञांना वाटते.

Tagged