धारूर : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात नेमणूक केलेले कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे त्यांची गटविकास अधिकारी सोपान आलेले गुरुवारी सुनावणी घेतली. सांगूनही कामाला येत नसल्यामुळे त्यांना मारण्यासाठी चक्क गटविकास अधिकार्यांनी संतापून दगड जमा केले होते. या प्रकारामुळे कर्मचार्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कोरोनाचे संकट आल्यामुळे तालुका आरोग्य विभागामध्ये डाटा एंट्री ऑपरेटरची गरज होती. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी पंचायत समितीकडे संगणकावर काम करणारे कर्मचार्यांची मागणी केली होती. त्यानुसार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी चार ग्रामपंचायत डाटा एन्ट्री कर्मचारी यांची आदेशाद्वारे नेमणूक केली होती. परंतु सदरचे कर्मचारी हे गत दीड महिन्यापासून कामावर हजर झाले नसल्याने दि.2 जुलै रोजी पंचायत समितीत सभापती, उपसभापती यांनी गटविकास अधिकारी यांना बोलावून पंचायत समितीच्या कामासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. यावेळी बैठकीनंतर गटविकास अधिकारी यांनी सदरील ग्रामपंचायत डाटा एंट्री कर्मचारी कामावर गेले नाहीत, त्यांची सुनावणी ठेवली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदर तीन कर्मचार्यांना गटविकास अधिकारी यांच्या दालनात बोलावण्यात आले होते. त्याअगोदर गटविकास अधिकारी यांनी येथील शिपायामार्फत दहा ते बारा दगड गोटे आणून टेबलवर ठेवले होते. सदरील दगड टेबलवर ठेवल्यामुळे कर्मचार्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. जे कर्मचारी कामावर जात नाही व ऐकत नाहीत अशांना आता दगडाशिवाय पर्याय नाही म्हणत त्यांनी चक्क दालनातच दगड जमा केले होते. या प्रकारामुळे डाटा एन्ट्री कर्मचार्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून गटविकास अधिकारी यांच्या याप्रकारामुळे इतर कर्मचार्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ न शकल्याने अधिकची माहिती प्राप्त होऊ शकली नाही.