पारनेर

न्यूज ऑफ द डे

राष्ट्रवादीत गेलेल्या पारनेरच्या पाचही नगरसेवकांच्या हाती पुन्हा ‘शिवबंधन’

By Karyarambh Team

July 08, 2020

अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादीत गेलेले पाचही नगरसेवक आपल्या हाती पुन्हा शिवबंधन बांधणार आहेत. ’मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार नीलेश लंके, मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाच नगरसेवकांची बैठक झाली. मातोश्रीवरील बैठकीपूर्वी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, आ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

बैठकीस तालुका महिला आघाडी प्रमुख उमताई बोरुडे, स्वीकृत नगरसेवक विजय वाघमारे, विजय औटी, आनंदा औटी, साहेबराव देशमाने, जितेश सरडे यांचीही उपस्थिती होती. नार्वेकर, आ. लंके व नगरसेवक यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. आघाडी सरकारवर परिणाम नको म्हणून पुन्हा शिवसेनेत परतण्यावर सर्वांचे एकमत करण्यासाठी आ. नीलेश लंके यांची यशस्वी शिष्टाई तर मिलिंद नार्वेकरांच्या मुत्सद्देगिरीला यश मिळाले आहे. मिलिंद नार्वेकर, आमदार नीलेश लंके हे नाराज नगरसेवकांशी समन्वय साधणार आहेत.

शिवसेना महिला तालुकाप्रमुख उमाताई बोरूडे यांच्यासह पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी गेल्या शनिवारी (दि. 4) बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला होता. आमदार नीलेश लंके यांच्या या खेळीमुळे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागला होता.

शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांना परत द्या, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर घडामोडी वेगाने घडल्या आणि राष्ट्रवादीत गेलेले शिवसेनेचे पाच नगरसेवक आता स्वगृही परतत आहेत.