beed lock down

बीड शहराचा लॉकडाऊन आज उठणार की वाढणार?

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि. 9 : बीड beed शहरात 2 जुलैपासून लॉकडाऊन lockdown करण्यात आला आहे. त्या लॉकडाऊनची मुदत आज रात्री 12 वाजता संपत आहे. परंतु हा लॉकडाऊन वाढणार की उठणार? याबाबत नागरिक ऐकमेकांना विचारपूस करीत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून याबाबत काहीच सांगितले जात नसून नागरिक संभ्रमात आहेत.

‘कार्यारंभ’ने याबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापपर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडून काहीच संकेत मिळाले नसल्याची प्रतिक्रीया महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकार्‍यांनी दिली. आरोग्य विभागाने देखील काहीच सांगता येत नाही, असे सांगितले. त्यानंतर ‘कार्यारंभ’ने काही लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून कानोसा घेतला असता त्यांनाही याबाबत काहीच सांगता येत नव्हते. जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून निर्णय घेतील अशी शक्यता आहे. मात्र लोकप्रतिनिधींना तसे वाटत नाही. जिल्हाधिकारी राहूल रेखावार rahul rekhawar फारफार तर पालकमंत्री धनंजय मुंडे dhananjay munde यांच्याशी चर्चा करून आपला निर्णय त्यांना कळवतील, असे एका लोकप्रतिनिधीने ‘कार्यारंभ’शी बोलताना सांगितले.

व्यापारी काय म्हणतात…
लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे हे खरे असले तरी त्याचं नुकसान जागा मालकांनी किराये माफ करून भरून काढायला हवे. कोरोनाच्या लढाईत जागा मालकांनी पडद्यामागचे कोरोनायोध्दे व्हावे, तसं अवाहन जिल्हाधिकार्‍यांनी जागा मालकांना करावं. ज्याला कोरोना झालाय किंवा ज्याला क्वारंटाईन केले त्याला विचारले तर तो म्हणेल की लॉकडाऊन वाढला पाहीजे कारण त्यानं कोरोनाशी प्रत्यक्ष दोन हात केले आहेत. पण ज्याचा अद्याप कोरोनाशी संबंधच आला नाही ते म्हणणार उद्योग व्यवसायाचं मोठं नुकसान होत आहे. हातावर पोट असणारांनी लॉकडाऊनमध्ये कसं जगायचं? हा प्रश्नच आहे. आपण कोरोनासोबत जगू. पण खरचं जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला तर आपल्याकडे सरकारी आरोग्य यंत्रणा तोंड देण्यास सक्षम नाही. खासगी दवाखान्यात जायचं म्हटलं तर लाखो रुपयांचं बील खर्ची होणार. त्यामुळे लॉकडाऊन वाढवायचा की नाही, याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. पण त्यांना जो काही निर्णय घ्यायचाय त्यासाठी मध्यरात्रीपर्यंत नागरिकांना ताटकळत ठेऊ नये, अशी प्रतिक्रीया बहुतांश व्यापार्‍यांनी व्यक्त केली.

आजच्या स्वॅब रिपोर्टनंतर वरीष्ठ अधिकार्‍यांची होऊ शकते बैठक
एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की आज तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबचे रिपोर्ट काय येतात त्यानंतर लॉकडाऊन संदर्भात जिल्हाधिकारी बीडच्या इतर विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करतील. त्यानंतर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी भ्रमनध्वनीद्वारे चर्चा करतील. त्यानंतरच लॉकडाऊन संदर्भातील निर्णय जाहीर होईल, अशी शक्यता आहे. पण सगळ्या प्रक्रीयेला रात्रीपर्यंतचा वेळ होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

कुठल्या तालुक्यातून किती स्वॅब गेले?
1) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड – 22
2) स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आंबाजोगाई – 3
3) उपजिल्हा रुग्णालय परळी – 48
4) ग्रामीण रुग्णालय माजलगाव – 19
4) उपजिल्हा रुग्णालय गेवराई – 16
6) ग्रामीण रुग्णालय आष्टी – 17
7)कोविड केअर सेंटर बीड -95
8) कोविड केअर सेंटर अंबाजोगाई -38
एकूण बीड जिल्हा 258


Tagged