maratha arakshan

न्यूज ऑफ द डे

मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी 27 जुलैला

By Karyarambh Team

July 15, 2020

जास्त दिवस प्रकरण न्यायालयात रेंगाळणार नाही

 मुंबई :  कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.मराठा आरक्षणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात रेंगाळणार नाही. येत्या 27 जुलैला या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. तीनच दिवसांत ही सुनावणी पूर्ण होणार आहे.

      त्यामुळे मराठा आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्याचं सुप्रीम कोर्टात काय होणार या उत्तरासाठी आता फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. केवळ तीन दिवसांठीच वेळ मिळतोय, यावर काही वकिलांनी आपला आक्षेप नोंदवला. हायकोर्टात ही सुनावणी 40 दिवस चालली होती. प्रकरण एका मोठ्या समाज घटकासाठी महत्वाचं आहे असंही सांगायचा प्रयत्न केला. पण कोर्टानं हा युक्तीवाद ऐकला नाही.

      आम्ही पाच महिने सुनावणी ऐकली म्हणजे न्याय दिला असं होतं का? असा प्रतिप्रश्न कोर्टानं केला. शिवाय विदेशात ब्रेक्झिटसारख्या महत्वाच्या प्रकरणाची सुनावणीही केवळ तासा दीड तासांत संपते असंही सांगितलं. त्यामुळे 27 जुलैनंतर पुढच्या तीन दिवसांतच ही सुनावणी पूर्ण होणार आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांना दीड दीड दिवसांचा वेळ मिळणार आहे. त्या त्या वकीलांनी आपापासात ठरवावं की कुणी कुठल्या क्रमानं युक्तीवाद करायचा आहे, असंही कोर्टानं यावेळी म्हटलं. शिवाय सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावर कुठलाही अंतरिम आदेश दिला नाही. त्यामुळे या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत तरी मराठा आरक्षणाला धोका नाही.

         पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या मराठा आरक्षणाला विरोध करत याचिका कोर्टात दाखल आहे. येत्या जुलै अखेरीस ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होतेय. पण आज त्यातही मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला कोर्टानं नकार दिला. 70 ते 75 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण झाली असल्याचं काही वकिलांनी नमूद केलं. या प्रकरणाचा राजकीय दृष्ट्याही परिणाम होणार आहे. त्यामुळेच आता याबाबत सुप्रीम कोर्टात काय निकाल लागतो हे अत्यंत महत्वाचं असणार आहे.