कोरोना अपडेट

‘त्या’ मयताच्या अंत्यविधीला अनेकांची उपस्थिती

By Karyarambh Team

July 17, 2020

नांदूरघाट :  नांदूरघाटमध्ये कोरोना संशयित म्हणून मयत झालेल्या तरुणाचा स्वॅब रिपोर्ट मंगळवारी निगेटीव्ह आला होता. त्यानंतर एकाच दिवसात त्या मयताच्या परिवारातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नांदूरघाटकरांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे मयताचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे गुरुवारी सकाळी त्याच्या राख सावडण्याच्या विधीला किमान 50 च्या आसपास नातेवाईक उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरु असतानाच रिपोर्ट आल्याने नातेवाईकामध्येही काळजीचं वातावरण पसरून गावात सन्नाटा पसरला होता. 

     गुरुवारी सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये मयताची आई आणि मुलगा पॉझिटिव्ह आढळून आला. त्याचवेळी नांदूरघाटमध्ये राख सावडण्याचा कार्यक्रम सुरु होता. त्यामुळे आता गावात पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

गावातील 32 वर्षीय युवकाच्या छातीत दुखू लागल्याने त्यास अंबाजोगाईच्या स्वारातिमध्ये दाखल करण्यात आले होते. 14 जुलैच्या पहाटे या युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर सायंकाळी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने मयताच्या नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द केला. तत्पुर्वी नातेवाईकांचेही स्वॅब घेण्यात आले होते. नातेवाईकांनी मृतदेह नांदूरघाट येथे आणून येथील स्मशानभुमीत मयतावर अंत्यसंस्कार केले. आज 16 जुलै रोजी मयताच्या राख सावडण्याचा विधी होता. त्यामुळे आजुबाजुच्या गावातील नातेवाईक या विधीसाठी आलेले होते. हा विधी सुरु असतानाच मयताच्या मुलाचा व आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती गावाला समजली. त्यानंतर गाव चांगलेच हादरून गेले.

पॉझिटिव्ह रुग्ण सोडलेच कसे?

दरम्यान मयताच्या नातेवाईकांचे स्वॅब घेतल्यानंतर त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु त्यांना मयताच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची परवानगी आरोग्य प्रशासनाने दिली. वास्तविक आरोग्य प्रशासनाने स्वॅब घेतलेल्या व्यक्तींचे रिपोर्ट आल्याशिवाय त्यांना मयताच्या अंत्यविधीला जाऊ देणे उचित नव्हते. आता आरोग्य विभागाच्या एका चुकीमुळे संपूर्ण नांदूरघाट भितीच्या सावटाखाली आहे.

प्रशासन गावात दाखल

नांदूरघाटमधील दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर प्रशासनही हादरून गेले आहे. केजचे तहसीलदार मेंडके, केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभूवन, महसूलचे कर्मचारी ग्रामपंचायतचे कर्मचारी गावात ठाण मांडून होते. गावानेच स्वतःहून भितीमुळे स्वतःला बंदीस्त करून घेतले आहे. नांदूरघाटच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. गावात बोहरून कोणी आत आणि आतून कोणी बाहेर जाऊ शकत नाही. गावात दैनंदिन गरजेच्या वस्तू पोहोच करण्यासाठी शिक्षकांची नियूक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासन गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्यावर संताप व्यक्त करीत प्रश्नांची सरबत्ती केली.