बीड : जिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधिताच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. याबाबतचे आदेश (दि.1) रोजी दिले आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात गेवराई येथील 72 वर्षीय रुग्णाचा व्हेंटिलेटर अभावी तडफडून मृत्यू झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरुन चांगलेच राजकारण देखील तापले. याप्रकरणी चौकशी करण्याची विविध पक्ष, संघटनांकडून मागणी होत होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ.राजेश कचरे, प्राध्यापक व विभागप्रमुख (मेडिसन) डॉ.एस.व्ही.बिराजदार, सहयोगी प्राध्यापक (भूलशास्त्र) डॉ.गणेश निकम या तीन सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, या मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी करुन विनाविलंब अहवाल सादर करावा असे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे.