गोवर्यातून वाहतूक होणारा 20 लाखाचा गांजा जप्त
इंदौर, दि.10 : अंमली पदार्थांची सहज तस्करी करता यावी यासाठी तस्कर नवनव्या क्लृप्त्या शोधत असतात. पण, यावेळी पोलिसांनी एका अशा टोळीला शोधलं आहे, जी शेणाच्या गोवर्यांमधून गांजाची तस्करी करत होती.मध्य प्रदेशच्या इंदूर येथे एका अमली पदार्थांची तस्करी करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी गेले अनेक महिने ही टोळी एक अजब शक्कल लढवत होती. गांजावर प्रक्रिया करून त्याचं रुपांतर एका शेणाच्या गोवरीप्रमाणे करण्यात येत होतं. मग अस्सल गोवर्यांमध्ये ठेवून त्याची तस्करी केली जात होती.शेणाच्या गोवर्यांची वाहतूक होत असल्याने पोलिसांना आधी संशय आला नाही. त्यामुळे या गाड्या बिनबोभाट जात राहिल्या. तसंच शेणाच्या वासामध्ये हा वास दडून जात असल्याने चटकन कळूनही येत नव्हतं. हा गांजा ऑरगॅनिक गांजा म्हणून चढ्या किंमतीलाही विकला जात होता. अखेर पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे गोवर्या भरून जाणारे ट्रक अडवले आणि त्यांची तपासणी केली, तेव्हा अशी तस्करी होत असल्याचं आढळलं. आजवर पोलिसांनी 20 लाखांचा गांजा जप्त केला आहे.