ATYACHAR

क्राईम

महानुभव पंथाच्या आश्रमातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By Karyarambh Team

August 14, 2020

बीडमधील प्रकार

महानुभव पंथाच्या आश्रमातून अन्य पाच मुली व सात मुलांची सुटका करण्यात आली आहे

बीड, दि.14 : बीड शहरापासून जवळच असलेल्या मांजरसुंबा घाटातील महानुभव पंथाच्या आश्रमातील एका 14 वर्षे वयाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ऐन गोपाळकाल्यादिवशी उघडकीस आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीसांनी येथील अश्रमावर छापा मारून अन्य 7 मुली आणि 5 अल्पवयीन मुलांचीही येथून सुटका केली आहे.घटनेची माहिती अशी की, येथील मांजरसुंबा घाट चढून गेल्यावर एक श्रीकृष्णाचे मंदिर आहे. हे मंदिर महानुभव पंथाचे आहे. या ठिकाणी अनेक महिला-पुरुष भक्त राहतात. अनेकजण नवस बोलून या पंथाच्या कार्यासाठी आपल्या मुला-मुलींना सोडून देतात. अशाच एका मुलीला ती 6 महिन्याची असताना सोडून देण्यात आले होते. दरम्यान ही मुलगी एका लग्न झालेल्या 40 वर्षीय भक्ताच्या संपर्कात आली. 15 दिवसापुर्वी या भक्ताने तिला पळवून नेले. त्यांनतर या मुलीच्या आई वडीलांनी बीड ग्रामीण ठाणे गाठून आपल्या मुलीला एका भक्ताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. त्यावरुन ग्रामीण ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला होता.ऐन श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी ही मुलगी व आरोपी बीड ग्रामीण ठाण्यात हजर झाले. त्या मुलीने दिलेल्या जवाबावरून त्या आरोपीविरोधात 376 व पोक्सो कायद्यान्वये शुक्रवारी गुन्हा नोंद झाला असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडे यांनी दिली. आज पीडित मुलीला बालकल्याण समिती समोर हजर केले असता पीडित मुलीने धक्कादायक जवाब नोंदविला. तिच्या म्हणण्यानुसार त्या आश्रमात माझ्यासारखीच अन्य मुलं-मुली आहेत. त्यांनाही पोलीस संरक्षणाची गरज आहे. त्यावरुन पोलीसांनी सदरील आश्रमावर छापा मारत तेथून अल्पवयीन असलेल्या 7 मुली व 5 मुलांना ताब्यात घेतले. सध्या या मुलांना बालगृहात ठेवण्यात आले आहे. प्रकरणातील पीडितांना व इतरांना न्याय देण्याचं काम सध्या बालकल्याण समिती करीत आहे.